विठू नामाने वरुर नगरी दुमदुमली
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव :- दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असूनही सुमारे ५० हजार विठ्ठल भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त' धाकटी पंढरी' श्रीक्षेत्र वरूर येथे श्रीविठ्ठल - रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले. टाळ - मृदंगाचा निनाद व ' पुंडलिक वरदा हरी विठ्ठल...' च्या जयघोषात विठ्ठल भक्त अक्षरशः भक्तीरसात चिंब झाले. तब्बल दोन वर्षाच्या खंडानंतर लाडक्या विठुरायाचे दर्शन झाल्याने भाविक - भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकाच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.
श्रीक्षेत्र वरुर येथे श्रीविठ्ठलाचे सुमारे ३५० वर्षांपूर्वीचे पुरातन भव्य मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील श्रीविठ्ठल - रुक्मिणीच्या सावळ्या वालुकामय मूर्ती स्वयंभू असल्याने वारकरी संप्रदायात या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने येथील त्रिवेणी संगमावर वैष्णवांचा मेळाच भरला होता. पंचक्रोशीतून वरुरला येणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.
सकाळी साडेदहा वाजता त्रिवेणी संगमावर गंगोदकाने भरलेल्या कावडीचे भागवताचार्य श्री.दिनकर महाराज अंचवले यांचे प्रमुख उपस्थितीत पूजन झाले. भागवतदेवा येळीकर व मुकुंद अंचवले यांनी पौरोहित्य केले. गंगाजलाने श्रीविठ्ठल-रुक्मिणीला जलाभिषेक व रुद्राभिषेक घालण्यात आला. सायंकाळी नगर प्रदक्षिणा तसेच श्री. राजू महाराज काटे यांचे नेतृत्वाखाली यादवबाबा भक्तीपीठातील टाळकऱ्यांचा रिंगण सोहळा पार पडला. रात्री श्री.अंचवले महाराजांचे किर्तन व हरी जागराचा कार्यक्रम झाला.
सकाळी आमदार मोनिका राजळे यांनी चिरंजीव कृष्णा समवेत विठू माऊलीचे दर्शन घेतले. विविध तरुण मंडळाच्या वतीने जागोजागी भाविकांना साबुदाणा खिचडीचे मोफत वाटप करण्यात आले.शेवगाव विभागाचे डीवायएसपी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक विलास पुजारी (शेवगाव), पीएसआय सचिन लिमकर (पाथर्डी) यांचे नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.
0 टिप्पण्या