लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझे याचा तुरुंगात छळ होत आहे. पोलीस सचिन वाझेला तुरुंगात विवस्त्र करुन त्याला शिवीगाळ करतात. सचिन वाझे याच्यावर दबाव आणला जात असल्याचा खळबजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला. आपल्याला सूत्रांकडून सचिन वाझेचा छळ होत असल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. परमबीर सिंह यांची नुकतीच सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) चौकशी झाली होती. या चौकशीतही परमबीर सिंह यांनी अनेक गौप्यस्फोट केले होते.
चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात वाझे आणि
अनिल देशमुख यांची भेट झाली होती. त्यावेळी वाझे यांनी ईडीला दिलेला जबाब परत
घ्यावा म्हणून देशमुख यांनी त्यांच्यावर दबाव टाकला होता. या भेटीदरम्यान
दोघांमध्ये चर्चा झाली होती, असा आरोपही परमबीर सिंह यांनी केलाय. तसेच ठाणे गुन्हे शाखेचे
पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सचिन वाझे मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत
असताना त्याच्यासोबत चर्चा केली होती. यावेळी पाटील यांनी सचिन वाझे याच्यावर दबाव
आणला होता, असे परमबीर सिंह
यांनी ईडीला सांगितले होते.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावल्यानंतर अनिल
देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अनिल देशमुख हे सध्या
न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआय आणि ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
0 टिप्पण्या