Ticker

6/Breaking/ticker-posts

पेट्रोल-डिझेलचा भडका ; कंपन्यांच्या दरवाढीने देशभरात इंधन महागले

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

 

मुंबई : कच्च्या तेलाचा भाव ७५ डॉलरवर गेल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांसाठी तेल आयातीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. मागील २२ दिवस इंधन दर स्थिर ठेवणाऱ्या कंपन्यांनी आज अखेर पेट्रोल दरात वाढ केली आहे. मंगळवारी देशभारत पेट्रोल २० पैशांनी महागले आहे. त्यापाठोपाठ आज डिझेलमध्ये २५ पैसे वाढ झाली आहे.

सलग तिसऱ्या दिवशी डिझेल वाढ्ले असून यामुळे मालवाहतूकदारांना फटका बसण्याची शक्यता आहे. यापूर्वी सोमवारी कंपन्यांनी डिझेल दरात २५ पैशांची वाढ केली होती. रविवारी देखील डिझेल २५ पैसे वाढ करण्यात आली होती.

पाच दिवसांत ९५ पैशांनी महागले डिझेल
कच्च्या तेलातील महागाईची झळ सोसत पेट्रोलियम कंपन्यांनी सलग १८ दिवस इंधन दरवाढ रोखून धरली होती. शुक्रवारी २४ सप्टेंबर रोजी कंपन्यांनी १८ दिवसांनंतर डिझेल दरात २० पैशांची वाढ केली होती. त्यानंतर शनिवारी इंधन दर स्थिर ठेवले. रविवारी डिझेलमध्ये २५ पैशांची आणि रविवारी २५ पैसे वाढ करण्यात आली. पाच दिवसांत डिझेल ९५ पैशांनी महागले आहे. तर पेट्रोलचा भाव २२ दिवसानंतर वाढला आहे.

देशभरात २२ दिवसानंतर पुन्हा एकदा पेट्रोल महागले आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.४७ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.३९ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.१५ रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.८७ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.८३ रुपयांपर्यंत वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.९० रुपये झाले आहे.

आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९७.२१ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८९.५७ रुपये झाला आहे. चेन्नईत ९४.१७ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.६७ रुपये प्रती लीटर इतका वाढला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.४३ रुपये असून बंगळुरात डिझेल ९५.०५ रुपये झाले आहे.

दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलातील तेजी कायम आहे. सोमवारी अमेरिकन बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ७९.५३ डॉलर प्रती बॅरल इतका वाढला. त्यात १.४४ डॉलरची वाढ झाली. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ७५.४५ डॉलर झाला. त्यात १.४७ डॉलरची वाढ झाली. सलग पाचव्या सत्रात कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. लवकरच तेलाचा भाव ८० डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या