Ticker

6/Breaking/ticker-posts

तालिबानला आव्हान !; अफगाण राष्ट्रध्वज फडकवला, महिलांचाही सहभाग

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

काबूल: अफगाणिस्तानमधील राजकीय नेतृत्व आणि लष्करी अधिकाऱ्यांनी शरणागती पत्करल्याने तालिबानने पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. तालिबान सरकार स्थापनेसाठी हालचाल करत असताना दुसरीकडे अफगाण जनता रस्त्यावर उतरली आहे. अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तालिबानची दहशत झुगारून देत नागरिकांनी राजधानी काबूलसह इतर ठिकाणी अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज फडकवला. काही ठिकाणी महिलांचा सहभाग लक्षणीय होता. असाबाद येथे तालिबानींनी केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाल्याचे वृत्त आहे.

बुधवारी जलालाबादमध्ये तालिबानचा झेंडा हटवून अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज लावण्याची मागणी झाली होती. त्यासाठी शेकडोजण रस्तांवर उतरले होते. एके ठिकाणी असलेला तालिबानचा झेंडा काढून अफगाणिस्तानचा झेंडा लावण्यात आला. सरकारी कार्यालये आणि इतर वास्तूंवरील तालिबानचे झेंडे काढण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी तालिबानींनी जमाव पांगवण्यासाठी गोळीबारही करावा लागला.

असादाबाद शहरातही अफगाणिस्तानच्या युवकांनी एक मोर्चा काढला. अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज लावण्याची मागणी करणाऱ्या जमावावर तालिबानीं गोळीबार केला होता. त्याशिवाय अफगाणिस्तानमधील इतर ठिकाणीही राष्ट्रध्वजासाठी आंदोलन करण्यात आले. राजधानी काबूलमध्येही लोकांनी दहशत झुगारून देत अब्दुल हक चौकात असलेला तालिबानचा झेंडा हटवून अफगाणिस्तानचा झेंडा फडकवला.

अफगाणिस्तानमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने झालेल्या या आंदोलनात अफगाणिस्तानच्या महिलांचाही सहभाग दिसून आला. काबूलमध्येच मंगळवारी काही महिलांनी शिक्षण, रोजगार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची मागणी करत सशस्त्र तालिबानींसमोर आंदोलन केले होते. या आंदोलनाची जगभरात चर्चा झाली.

दरम्यान, उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला राष्ट्रपती घोषित करून युद्ध अजून संपले नसल्याचे म्हटले होते. आधीच्या तुलनेत आता राज्य करणे हे तालिबानला अधिक आव्हानात्मक असणार असल्याचे म्हटले जात आहे. भविष्यात तालिबानविरोधात लोकांचे आंदोलन पेटण्याची शक्यता असल्याने तालिबान कट्टरतावादापेक्षा लवचिक धोरण स्वीकारत असल्याची चर्चा आहे. तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर काबूलमध्ये काही मोजक्याच महिलांनी आंदोलन केले. तालिबानी राजवट येताच महिलांच्या अधिकारांबाबत चर्चा होत असताना हे आंदोलन झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या