Ticker

6/Breaking/ticker-posts

मंदिरे १० दिवसांत उघडा, अन्यथा...; अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला इशारा

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

राळेगणसिद्धी (ता. पारनेर) : मंदिरे उघडण्यासाठी राज्यातील विरोधी पक्षासह काही लोकांनी आक्रमक भूमिका घेतलेली असताना आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे देखील या लढाईत उतरले आहेत. आतापर्यंत भ्रष्टाचार आणि त्यासंबंधीच्या कायद्यांच्या मागणीसाठी अनेक आंदोलने केलेल्या अण्णा हजारे यांनी आता मंदिरे उघडण्यासाठी रस्त्यावर येण्याचा इशारा दिला आहे.

मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करा. तरीही १० दिवसांत जर मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही, तर जेल भरो आंदोलन करा, मी तुमच्या बरोबर राहील,’ अशी ग्वाहीच मंदिर बचाव कृती समितीला हजारे यांनी दिली आहे. नगरच्या मंदिर बचाव कृती समितीने अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. त्यांना राज्यातील बंद असलेली सर्व मंदिरे उघडण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती केली. त्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना हजारे यांनी सरकारला इशारा दिला.

हजारे म्हणाले, ‘मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकाने, हॉटेल सुरू करण्यात आली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून करोना वाढत नाही का? जेथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवलं? मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरलं पाहिजे. मंदिर बचाव कृती समितेने यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल. सरकारचे हे धोरण बरोबर नाही. दहा दिवसांत जर मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाहीतर मोठे जेल भरो आंदोलन करा. मी तुमच्या बरोबर राहील. भरकटत चाललेल्या समाजाला फक्त मंदिरेच तारू शकतात, यावर माझा विश्वास आहे. मी आज जे काही आहे ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या संस्कारामुळेच आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीजवळ जाऊन तुळशीची माळ घालून वारकरी झालो. संतांचे विचार देणारी मंदिरे का बंद केली? सरकारला संतांचे विचार काय समजले? त्यामुळे सरकाने आपले धोरण बदलावे व त्वरित मंदिरे उघडावीत,’ असंही अण्णा हजारे म्हणाले.

दरम्यान, कृती समितीचे प्रमुख वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, श्री शिव प्रतिष्ठानचे बापू ठाणगे, बाळासाहेब खताडे, गणेश पलंगे उपस्थित होते. अण्णा हजारे यांना यासंबंधीचे निवदेन देण्यात आलं. त्यावर विशाल गणपती मंदिराचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर व शिर्डी साईबाबा देवस्थानचे माजी ट्रस्टी सचिन तांबे यांच्याही सह्या आहेत. हजारे यांची भेट झाल्याने आणि त्यांनी पाठिंबा दिल्याने आमचे बळ वाढले असून आता हजारे यांच्या नेतृत्वाखाली यासाठी मोठे आंदोलन उभारण्यात येईल,’ असं लोढा यांनी सांगितलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या