लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
राहुरी: येथील पत्रकार तथा माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते
रोहिदास दातीर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे (वय ४६, रा. वांबोरी, ता. राहुरी)
याने जिल्हा रुग्णालयातून पलायन केलं आहे.
मोरे याला करोनाचा संसर्ग झाल्याने काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात दाखल
करण्यात आलं होतं. मात्र शनिवारी सायंकाळी लघुशंकेचे निमित्त करून पोलिसांची नजर
चुकवत तो पळून गेला.
पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपी कान्हू मोरे याला
अटक केली होती. मात्र आता त्याने पलायन केलं आहे. या खटल्याचं दोषारोपपत्र दाखल
झालेलं असताना आरोपीने पलायन केल्याने पोलिसांसाठी हा मोठा धक्का आहे.
शनिवारी
सायंकाळी आरोपी मोरे याने पलायन केले. त्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून
त्याचा शोध सुरू आहे. तो खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी तर आहेच शिवाय करोनाचा
रुग्णही असल्याचे चिंता अधिक वाढली आहे. आरोपी मोरे हा पाच फूट उंचीचा असून, अंगात पिवळा शर्ट घातला आहे. मजबूत शरीर यष्टी
आणि दाढी वाढलेली आहे. कोणाला आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन
करण्यात आलं आहे.
राहुरीतील
पत्रकार दातीर यांचा ६ एप्रिल २०२१ रोजी खून झाला होता. प्रथम त्यांचे अपहरण केले
आणि नंतर खून करून मृतदेह शहरात आणून टाकण्यात आला होता. सुरुवातीला या प्रकरणात
पोलीस चालढकल करत असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर याचा तपास पोलीस उपअधीक्षक
संदीप मिटके यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यांनी काही दिवसांतच आरोपीचा ठावठिकाणा
शोधून त्याला अटक केली.
नेवासा फाटा येथील एका हॉटेलमध्ये तो लपून
बसला होता. त्याचे अन्य साथीदारही पकडले गेले. आरोपी मोरे याला न्यायालयाने दहा
दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत होता. मधल्या
काळात या गुन्ह्याचे दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल झालं आहे. आरोपी मोरे याने
जमिनीच्या कारणावरून दातीर यांचा खून घडवून आणल्याचं तपासाच निष्पन्न झालं आहे.
न्यायालयीन कोठडीत असताना गेल्या आठवड्यात
मोरे याला करोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे त्याला राहुरी येथून नगरच्या जिल्हा
रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. त्याच्यावर पोलिसांची नजर होती. त्याला पुढील
उपचारासाठी पुण्याला हलवण्यास सांगण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी त्याने
लघुशंकेचा बहाणा केला आणि पोलिसांची नजर चुकवून तो पळून गेला.
0 टिप्पण्या