Ticker

6/Breaking/ticker-posts

घरात ५० लाखांची कॅश ;मध्य रेल्वेचा बडा अधिकारी जाळ्यात

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

जळगाव भुसावळ येथील मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयात अर्थात डीआरएम ऑफिसमध्ये सीबीआयची पथकाने आज दुपारी धाड टाकली. मंजूर निविदांची वर्क आर्डर देण्यासाठी लाच घेणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना या पथकाने अटक केली.

मलकापूर येथील एका कंत्राटदारास मंजूर निविदांची वर्क ऑर्डर देण्यासाठी भुसावळ डीआरएम कार्यालयातील मंडळ अभियंता एम एल गुप्ता यांनी दोन लाख तर कार्यालयीन अधीक्षक संजीव राडे यांनी ४० हजारांची लाच मागितली होती. त्यामुळे या तक्रारदाराने नागपुर येथील सीबीआय कार्यालयाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून सीबीआयच्या १८ अधिकाऱ्यांचे पथक भुसावळ येथे तळ ठोकून होते. या पथकाने मिळालेल्या तक्रारीची संपूर्ण शहानिशा केली. त्यानंतर आज सापळा लावून ही कारवाई करण्यात आली. मंडळ अभियंता एम. एल. गुप्ता व लिपिक संजीव राडे यांना २ लाख ४० हजारांची लाच घेताना सीबीआयच्या पथकाने कार्यालयातच रंगेहाथ अटक केली. सीबीआयच्या या पथकात नागपूर, पुणे व दिल्लीतील अधिकाऱ्यांचा समावेश होता. नागपूर येथील सीबीआयचे उपअधीक्षक एस. आर. चौगुले व उपअधीक्षक दिनेश तळपे या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हा सापळा यशस्वी करण्यात आला.

गुप्ता यांच्या घरातून ५० लाखांची रोकड जप्त

मंडळ अभियंता एम. एल. गुप्ता यांच्या कार्यालयात ही कारवाई होताच डीआरएम कार्यालयात शुकशुकाट पसरला होता. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास गुप्ता व राडे यांच्या घराच्या तपासणीसाठी अधिकाऱ्यांचे पथक रवाना झाले होते. सीबीआयच्या पथकाने गुप्ता यांच्या निवासस्थानी धाड टाकली. यात ५० लाख रुपयांची रोकड व काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

आणखी काही बडे मासे अडकण्याची शक्यता

रेल्वे कर्मचाऱ्यांची वसाहत व कोच केअर सेंटरच्या नुतनीकरणासाठी अनुक्रमे एक कोटी ३४ लाख ८८ हजार ८२० तर केंद्राच्या नुतनीकरणासाठी एक कोटी १३ लाख ३५ हजारांच्या निविदा जुलै महिन्यात काढण्यात आल्या. यासाठी तक्रारदाराच्या फर्मची निवड झाली. कार्यादेशाला मंजुरी देण्यासाठी एम. एल. गुप्ता व संजय राडे या दोघांनी चार लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली. पहिल्या हप्त्यात दोन लाख ४० हजार रुपयांची मागणी दोघांनी तक्रारदाराकडे केली. तक्रारदाराने याबाबत नागपूर सीबीआयच्या लाच लुचतप प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सीबीआयने पुढील कारवाई केली. दोघांविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वयवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची सीबीआय कोठडी घेण्यात आली आहे. सीबीआयच्या या कारवाईमुळे मध्य रेल्वेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणात आणखीही काही बडे मासे अडकण्याची शक्यता सीबीआयच्या सूत्रांनी वर्तवली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या