Ticker

6/Breaking/ticker-posts

शिराळ्यातील फार्म हाऊसमध्ये १९ जिवंत नाग !; नेमकं काय घडलं जाणून घ्या...

 

*बत्तीस शिराळ्यातून १९ जिवंत नाग ताब्यात.

*कापारी गावातील फार्म हाऊसमध्ये कारवाई.

*नागपंचमीसाठी नाग पकडले असल्याचे स्पष्ट.लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

सांगली: बत्तीस शिराळा येथून जवळच असलेल्या कापारी या गावातील दिनकर निकम यांच्या फार्म हाऊसमधून वन विभागाने जिवंत १९ नाग ताब्यात घेतले. प्रदर्शनासाठी बेकायदेशीररित्या नाग पकडून ते बाळगले होते. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर वन विभागाच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. दरम्यान, या कारवाईमुळे नागपंचमीच्या सणासाठी शिराळा परिसरात काही लोकांनी बेकायदेशीरपणे नाग पकडल्याचे स्पष्ट होत आहे.

वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संगली वनविभागाला खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली. कापरी येथील एका फार्म हाऊसमध्ये जिवंत नाग ठेवल्याचे खबऱ्याने सांगितले. या माहितीनुसार वन विभागाच्या पथकाने मौजे कापरी गावच्या हद्दीमधील उत्तम दिनकर निकम यांच्या शेतामधील फॉर्म हाऊसमध्ये छापा टाकून कारवाई केली. उप वनसंरक्षक विजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शिराळा यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी जात कापरी हद्दीतील उत्तम दिनकर निकम शेतातील फॉर्म हाऊसची तपासणी केली असता १९ जिवंत नाग मिळाले. वनविभागाच्या पथकाचा सुगावा लागताच संशयितांनी तेथून धूम ठोकली. घटनास्थळावरून १९ नागांसह नाग ठेवण्यासाठी वापरलेले मातीचे माठ आणि पोती जप्त करण्यात आली आहेत.

जप्त नागांची वैद्यकीय तपासणी इस्लामपूरचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली. याप्रकरणी वन्य जीव संरक्षण कायद्यांतर्गत अज्ञातांविरोधात शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उप वनसंरक्षक विजय माने यांनी दिली. या कारवाईत वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक व वनमजूर शिराळा, वनक्षेत्रपाल फिरते पथक सांगली, मानद वन्यजीव रक्षक सांगली यांच्या पथकाने सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या