Ticker

6/Breaking/ticker-posts

बनावट कागदपत्रांच्या आधारे गाडीची विक्री; फसणूक करणारे पिता-पुत्राचा फरार

 


लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

नवी मुंबई: खारघर भागात राहणाऱ्या पिता-पुत्राने बँकेचे कर्ज असलेली त्यांची गाडी एका शिक्षकाला विकून त्याची तीन लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या पिता-पुत्राने कारवर कुठल्याही बँकेचे कर्ज नसल्याचे बनावट आरसी बुकदेखील या शिक्षकाला दिल्याचे उघडकीस आले आहे. खारघर पोलिसांनी या पिता-पुत्रावर फसवणूक तसेच बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आफाक अहमद मुश्ताक अहमद जमादार असे आहे. तर, त्यांची फसवणूक करणाऱ्या पिता-पुत्राचे नाव वहीद सियतअली शेख व वसीम वहीद शेख अशी आहेत. आफाक जमादार हे कोल्हापूर येथे शाळेत शिक्षक आहेत. आफाक यांना सेकंडहॅन्ड गाडी खरेदी करायची असल्याने त्यांनी ओएलएक्सवर गाडीची शोधा-शोध सुरू केली होती. त्यावेळी नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांना ओएलएक्सवर रेनोल्ट डस्टर कार विकण्यासाठी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गाडीमालक वसिम शेख याला संपर्क साधला होता.

त्यावेळी वसीम शेख याने ही गाडी त्याच्या वडिलांच्या नावावर असल्याचे व गाडीवर कुठल्याही बँकेचे कर्ज नसल्याचे सांगितले होते. तसेच, गाडीची कागदपत्रेसुद्धा दाखविली होती. त्यानंतर त्यांच्यात दोन लाख ८० हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला. त्यानंतर काही दिवसांमध्ये वसिमला दोन लाख ८० हजारांची रक्कम दिल्यानंतर वसिम शेख याने आफाक जमादार यांना खारघरमधील उत्सव चौकात गाडी आणि त्याची कागदपत्रे दिली. त्यानंतर आफाक यांनी ही गाडी कोल्हापूर येथे नेऊन एक लाख रुपये खर्च करून गाडीची दुरुस्ती करून घेतली.

मात्र आफाक यांना अचानक आर्थिक अडचण आल्याने त्यांनी महिनाभरातच ही गाडी तीन लाख ५० हजार रुपयांमध्ये विक्रीसाठी काढली. त्यासाठी आफाक आरटीओ कार्यालयात गेल्यानंतर या गाडीवर आयडीएफसी फर्स्ट बँकेचे कर्ज असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर वसीम शेख व वहीद शेख यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी वसीम शेख व वहीद शेख या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल केला.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या