Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगाव बनलेय गुन्हेगारीचे ' कुरुक्षेत्र ' ; सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल..!पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह ?


        

लोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


(जगन्नाथ गोसावी)
      शेवगाव : आपण ' धाक ' अर्थात ' दरारा ' ज्याला म्हणतोय ना, त्या ' धाक ' नावाचं अस्तित्वच उरलं नसल्याने शेवगाव तालुक्यात गुन्हेगारीचं. स्तोम  माजलाय. त्यामुळे एकेकाळचे शांतताप्रिय शहर असलेल्या शेवगावची ओळख गुन्हेगारीचे ' कुरुक्षेत्र ' बनण्याची चिन्हे आहेत. सातत्याने वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे शेवगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा श्वास गुदमरतोय.. किंबहुना त्यांचं जगनच मुश्किल होऊन बसलय, ही वस्तुस्थिती आहे.

     कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची ज्यांची जबाबदारी आहे, त्या पोलीस प्रशासनाची  अवस्था ' असून अडचण,नसून खोळंबा ' अशी बनल्याने येथे प्रत्येक जण आपला जीव मुठीत धरून जगत आहे. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या तडकाफडकी बदलीनंतर संवेदनाशील मालेगाव शहर हाताळलेले दिगंबर भदाने येथे रुजू झाले. मात्र,अद्यापपर्यंत ते आपला करिष्मा ? दाखवू शकले नाहीत. शेवगावचे डीवायएसपी यांचा विभागात कुठेही वचक व दबदबा दिसत नाही. पाथर्डी,नेवासा,सोनई व शनिशिंगणापूरची अवस्था शेवगावपेक्षा वेगळी नाही, हे वाढत्या गुन्हेगारीच्या आलेखावरून अधोरेखित होते.

        शेवगाव,पाथर्डीत येणारा प्रत्येक क्लास वन,क्लास टू अधिकारी लोकप्रतिनिधींच्या शिफारशीशिवाय रुजू होत नाही, असा आजवरचा प्रघात आहे. मात्र,हे अधिकारी स्थिरस्थावर झाल्यावर आपले ' रंग ' दाखवायला सुरू करतात, हा सर्वसामान्य जनतेचा आजवरचा अनुभव आहे.
     शेअर मार्केट ट्रेडिंगच्या व्यवसायाने व्यापलेला तालुका अशी शेवगावची नवी ओळख तयार झाली आहे. अन्य धंद्यासह या व्यवसायात असलेल्यांची सर्व माहिती पोलिसांकडे आहे. पोलिसांबरोबरच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी ट्रेडिंग कंपन्यांच्या चालकांना धमकावत गंडवले. त्यांची मोठी आर्थिक लूट केली, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. किंबहुना,त्यांच्या अपहरणापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली.स्थानिक पोलीस अधिकारी, अधिकाऱ्यांच्या जवळचे कर्मचारी,जिल्हा विशेष शाखा तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना या धंद्याची माहिती नाही काय?. वाढते अवैध धंदे व गुन्हेगारी व  सैराट शेअर मार्केट ट्रेडिंगबाबत . जिल्हा पोलीस प्रमुखांचे मौन का ?  हे सुज्ञास सांगणे न - लगे. 

मध्यंतरी नगरच्या एलसीबी पथकाने शेवगाव जवळच्या एका गावात शेअर मार्केट ट्रेडिंगवाल्याकडून दहा लाख रुपये  तर,दुसरीकडे शेवगावमध्ये नव्या दमाच्या फौजदाराने दोन कॉम्प्युटर,झेरॉक्स चालकाकडून प्रत्येकी एक लाख रुपये उकळल्याची वंदता आहे. 

    आजमितिला शेवगाव शहर व तालुक्यात चोऱ्या,घरफोड्या, रस्ता लूट,शेवगाव एसटी स्टँडवर प्रवासी महिलांच्या पर्समधून गायब झालेले लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने, गावठी कट्ट्याचा सुळसुळाट.. त्यातून होणारे  गोळीबार तसेच अवैध धंद्याने धुमाकूळ घातला आहे. रात्रीची गस्त नावाला उरली आहे. स्थानिक नागरिक या धंद्यांना अक्षरशः विटले आहेत. मटका,जुगाराचे राजरोस चालणारे धंदे,देशी,विदेशी दारुची अवैध विक्री,मावा,गांजा विक्री,लॉजवर चालणारा देहविक्रय हे धंदे पोलिसांकडून  नजर अंदाज केले जात आहेत.  त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य आहे? , मुरूम व डबराचे उत्खनन व चोरटी वाहतूक या सर्व धंद्यातून पोलिस दरमहा  'लाखांवर लेखण'. फिरवीतात. त्यासाठी विभागवार खास ' कलेक्टर' नेमलेले आहेत.  या 'अर्थपूर्ण' जिझिया व्यवहारामुळे पोलिसांमध्ये अंतर्गत गटबाजी, धुसफुस, हेवेदावे वाढले आहेत.

     एकुणच  शेवगाव तालुक्याची गुन्हेगारीकडे झपाट्याने वाटचाल सुरू आहे. काल- परवा बालमटाकळीच्या परीक्षा केंद्रावर कॉपी बहाद्दरांनी घातलेला धुडूगस पोलीस खात्याची मान शरमेने खाली घालायला लावणारा आहे. अधोगतीकडे वाटचाल करणारा शेवगाव तालुका शांत राहावा,येथील जनतेला भयमुक्त जीवन जगता यावे, अशी  राजकारण्यांची ईच्छा दिसत नाही. यासाठी लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करणार की फक्त मतांचा जोगवा मागणार ? असा  प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,पोलीस महासंचालक तसेच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना शेवगाव तालुक्याच्या वाढत्या गुन्हेगारीची माहिती नाही का ? त्यांची या संवेदनशील विष याकडे डोळेझाक  तर  चाललेली नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने पुढे आले आहेत.

याबाबत पोलिसांकडून धडाकेबाज कारवाईची अपेक्षा आहे.
तसेच जनतेचा पोलिसांवरील विश्वास उडाल्याने  ठोस उपाययोजना अपेक्षित आहेत. त्यामुळे पोलीस व जनता यांच्यात सुसंवादाच्या दृष्टीने बैठक घेण्याची गरज आहे.बघू या आशाळभूत नजरेने..काय-काय होतय ते., त्याशिवाय सर्व  सामन्यांच्या हातात दुसरे आहे तरी काय?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या