Ticker

6/Breaking/ticker-posts

जळगावच्या उपमहापौरांवर गोळीबार; शहरात तणाव

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 जळगाव: जळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या गोळीबारातून कुलभूषण पाटील थोडक्यात बचावले आहेत. किरकोळ वादानंतर थेट उपमहापौरांवरच गोळीबार करण्यात आल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची चर्चा रंगत असतानाच उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मात्र वेगळ्याच घटनेतून हा हल्ला झाल्याची माहिती दिली आहे. तसंच या हल्ल्याबाबत मी स्वत: पोलिस स्थानकात तक्रार देणार असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

 ' दुपारी एका क्रिकेट सामन्यादरम्यान दोन गटांतील तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचल्याने वाद सोडवण्यासाठी मी मध्यस्थी केली. मात्र मी केलेली मध्यस्थी यातील एका गटाला आवडली नाही. त्यामुळे त्यांनी दुपारपासूनच फोन करून मला धमक्या देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर संध्याकाळी उशिरा या तरुणांनी माझ्यावर गोळीबार केला,' असा दावा कुलभूषण पाटील यांनी केला आहे.

' मला गुन्हेगारी कृत्य करण्यास भाग पाडू नका'

'वादातून काही हाती लागणार नाही, असं म्हणत मी त्या तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु ते तरूण आक्रमक झाले असून त्यांनी माझ्यावरच हल्ला केला. मलाही कुटुंब आहे आणि त्या तरुणांनाही कुटुंब आहे. त्यामुळे या सर्वांना मी सांगू इच्छितो की माझ्यावर माझ्या आई-वडिलांचे तसे संस्कार नाहीत, पण तुम्ही मला गुन्हेगारी कृत्य करण्यास भाग पाडू नका,' असा इशाराच कुलभूषण पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, किरकोळ वादानंतर थेट उपमहापौरांवरच गोळीबार करण्यात आल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या गोळीबार प्रकरणी पोलिस नक्की काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या