Ticker

6/Breaking/ticker-posts

पावसाचा जोर कमी झाला तरी सांगली अजूनही जलमय; कृष्णेची पाणी पातळी ५५ फुटांपर्यंत

 

*जिल्ह्यात आतापर्यंत दीड लाख पूरग्रस्तांचे स्थलांतर.
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 सांगली:कोयना धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे सांगलीत कृष्ण नदीची पाणीपातळी ५५ फुटांपर्यंत पोहचली आहे. शहरातील एसटी स्टँड, गावभाग, स्टेशन चौक, आयुक्त बंगला, मार्केट यार्डसह महत्त्वाच्या परिसरात पाणी शिरल्याने नागरिकांना स्थलांतर करावे लागले. रविवारपर्यंत शहरासह जिल्ह्यातील दीड लाख पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे, तर दोन लाखांहून अधिक जनावरांनाही महापुराचा फटका बसला आहे. दरम्यान, कराड ते भिलवडी दरम्यान कृष्णा नदीच्या पुराचे पाणी ओसरू लागले आहे. मात्र सांगलीत अजूनही पुराचा वेढा कायम असल्याने सांगलीकरांची चिंता वाढली आहे.


गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग ५३ हजार क्युसेकवरून ३० हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. वारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग ३० हजार क्युसेकवरून आठ हजार क्युसेकपर्यंत कमी झाला आहे. धरणांमधून होणारा विसर्ग कमी झाल्यानंतरही सांगलीतील पुराचा वेढा कायम आहे. रविवारी सायंकाळी आयर्विन पूल येथे कृष्णा नदीची पाणी पातळी ५५ फुटांपर्यंत पोहोचली. यामुळे सांगली शहर जलमय झाले. शहरातील एसटी स्टँड, गावभाग, मार्केट यार्ड, कापड पेठ, स्टेशन चौक, आयुक्त बंगला, अमराई यासह प्रमुख भागात पाणी शिरले. महापुरामुळे शहरासह जिल्ह्यातील दीड लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे लागले. शहराच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीमुळे वाळवा तालुक्यातील येलूर येथे रस्ता खचला आहे. शिराळा तालुक्यातील डोंगराळ भागात अनेक ठिकाणी जमीन खचण्याचे प्रकार घडले आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांनी वारणा काठावरील कणेगाव, तांदुळवाडी, कुंडलवाडी, ऐतवडे खुर्द, चिकुर्डे येथे पाहणी करून पूरग्रस्तांशी संवाद साधला. कराड ते भिलवडी या दरम्यान कृष्णा नदीच्या पुराची पातळी रविवारी पाच ते सहा फुटांनी कमी झाली. मात्र, सांगली शहरात पुराच्या पातळीत दिवसभरात वाढ सुरूच होती. सोमवारी सांगली शहरातील पूर ओसरू लागेल, असा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तवला आहे. दरम्यान,अलमट्टी धरण   पूर्ण क्षमतेने भरले नसतानाही सांगलीत पुराची भीषण स्थिती निर्माण झाल्याने सांगलीतील पुराच्या अन्य कारणांचाही शोध घ्यावा लागणार आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या