Ticker

6/Breaking/ticker-posts

पारनेरच्या पश्चिम भागात पट्टेरी वाघाचा संचार ; नागरिकांमध्ये दहशत

   









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


 अळकुटी ता. पारनेर : अनेकवेळा बिबट्याच्या दर्शनाने तसेच त्याच्या हल्ल्याने दहशतीखाली असणाऱ्या तालुक्याच्या पश्चिम भागात दुर्मीळ पट्टेरी वाघ आढळल्याने नागरिकांमध्ये पुन्हा दहशत पसरली आहे. हा पट्टेरी वाघ भीमाशंकर (जुन्नर) परिसरातील जंगलातून आला असावा, अशी शक्यता वन्यजीव अभ्यासक विनोद बारटक्के (पुणे) यांनी वर्तवली आहे.


 म्हस्केवाडी येथील कुणाल म्हस्के व धनंजय खामकर हे दोन तरुण १७ जुलै रोजी पहाटे अळकुटी येथून मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून घराकडे परतत असताना  म्हस्केवाडी - माळवाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या कांदा साठवणुकीच्या दगडी चाळीवर (आरण) वाघ आढळला. त्यांनी गाडी मागे घेतली. गाडी मागे घेताना झालेल्या आवाजाने वाघ सावध झाला. तो रस्त्यावर आला. त्या वेळी तरुणांनी पट्टेरी वाघाची ध्वनिचित्रफीत तयार केली.

म्हस्केवाडीचे सरपंच किरण पानमंद, औषधे व्यावसायिक विठ्ठल पानमंद, वाहन चालक संतोष खामकर, संदीप चौगुले आदींना गेल्या पंधरा दिवसांत पट्टेरी वाघाने दर्शन दिले आहे. मात्र या परिसरात बिबटय़ाचा वावर असल्याने नेमका वाघ आहे की बिबट्या याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र कुणाल व धनंजय या तरुणांनी पट्टेरी वाघ ध्वनिचित्रफितीत कैद केल्याने म्हस्केवाडी, चोंभूत परिसरात पट्टेरी वाघाचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

वन्यजीव अभ्यासक विनोद बारटक्के यांच्या मते, वाघाची पिले साधारण दोन ते वर्षांची झाल्यावर पिलांचा सांभाळ करणे नर व मादी वाघ थांबवतात. त्यानंतर या वाघांना ज्या परिसरात दुसऱ्या वाघाचा अधिवास नाही असा स्वत:चा प्रदेश शोधावा लागतो. अशाच प्रदेशाच्या शोधात दोन ते चार वर्षे वयाचा वाघ भीमाशंकर परिसरातून म्हस्केवाडी परिसरात आला असावा.

येथून भीमाशंकरचे जंगल सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर आहे. एवढे अंतर वाघ एका रात्रीत पार करू शकतो. स्वत:च्या परिसराच्या शोधात हा वाघ आलेला असावा अशी शक्यता बारटक्के यांनी वर्तवली आहे. आपला प्रदेश निश्चित केल्यानंतर नर जातीचा वाघ सुमारे पन्नास वर्ग किलोमीटर परिसरात दुसऱ्या नर वाघाला प्रवेश करू देत नाही. मादी वाघ सुमारे तीस ते चाळीस वर्ग किलोमीटर परिसरात दुसऱ्या वाघिणीला प्रवेश करू देत नाही. त्यामुळे एकदा वाघाने स्वत:चा प्रदेश निश्चित केल्यानंतर त्या परिसरात वाघांची संख्या वाढत नाही.

वन विभागाचे  नागरिकांना कायद्याचे डो
या पट्टेरी वाघाची ध्वनी चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर
वनविभागाने स्थानिक नागरिकांना कायद्याचे ढोस दिले त्याने नागरिक अजून भयभीत झाले परंतू या परिसरात आधीच बिबट्याची दहशत असताना अनेकांना पट्टेरी वाघाचेही दर्शन झाले असून या दोन तरूणांनी वाघाची ध्वनिचित्रफीतच तयार केली व ती व्हायरल झाल्याने परिसरातील नागरिकही सतर्क झाले . वनविभागाने दहशतीखाली असणाऱ्या नागरिकांना बिबट्या व पट्टेरी वाघाचा बंदोबस्त करून सहकार्य करावे अशी मागणी सरपंच किरण पानमंद व ग्रामस्थांनी केली आहे .


 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या