Ticker

6/Breaking/ticker-posts

केंद्राकडे बोट दाखवणे ही आघाडीच्या मंत्र्यांची नवी फॅशन; विखे पाटील यांचा टोला

 


लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

राहाता : 'ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न जेव्‍हा निर्माण झाला तेव्‍हाच आम्ही विधानसभेत सरकारला ठणकावून सांगितले होते की, यासाठी गांभिर्याने निर्णय करा. मात्र या समाजाला आरक्षण मिळू द्यायचे नाही ही कॉंग्रेसचीच इच्‍छा आहे,' असा आरोप भाजपचे ज्येष्ठ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. 'मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण गेल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित मंत्र्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत अन्यथा मराठा, ओबीसी समाजाचा एल्गार या मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही,' असा इशाराही विखे पाटील यांनी दिला.

विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील राहाता येथे नगर मनमाड रस्त्यावर मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यावेळी विखे पाटील बोलत होते. मराठा आणि ओबीसी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी सरकारने तातडीने उपाय योजना कराव्यात, या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना सादर करण्यात आले. आघाडी सरकारच्‍या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून नगर मनमाड महामार्ग काही वेळ अडविण्‍यात आला होता.

यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, 'समाजाचे प्रश्न जेव्हा ऐरणीवर येतात तेव्हाच या सरकारला करोना आठवतो. परंतू मंत्रालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराच्या वेळेस करोना नसतो का? आरक्षणाच्या प्रश्नावर आपले पितळ उघडे पडेल या भितीपोटी सरकार विधानसेभेचे अधिवेशन घेण्यास टाळाटाळ करीत आहे. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण भाजप सरकारने सर्व प्रयत्‍न करुन मिळवून दिले होते. ते या आघाडी सरकारने घालवून दाखविले, असा आरोप विखे पाटील यांनी केला आहे.

' कोणत्‍याच समाजाच्‍या आरक्षणाच्‍या प्रश्‍नावर हे सरकार गंभीर नाही. आता अपयश आल्‍यामुळे केंद्र सरकारकडे बोट दाखविले जात आहे. राज्‍यातल्‍या आघाडीच्‍या मंत्र्यांची ही एक नवी फॅशन झाली आहे. दोन्‍हीही समाजाची आरक्षण गेल्‍याने सामाजिक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्‍यामुळेच आरक्षणाच्‍या बाबतीत सरकारने आपली भूमिका स्‍पष्‍ट करावी अन्‍यथा राज्‍यात आज फक्‍त चक्‍काजाम आंदोलने झाली. परंतू भविष्‍यात ओबीस, मराठा समाजाचा हा एल्‍गार मंत्र्यांना राज्‍यात फि‍रु देणार नाही,' असा इशारा त्‍यांनी दिला.

माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, ओबीसी मोर्चाचे अध्‍यक्ष बाळासाहेब गाडेकर, माजी नगराध्‍यक्ष राजेंद्र पिपाडा, भाजयुमोचे जिल्‍हाध्‍यक्ष सतिष बावके यांची भाषणे झाली. या आंदोलनात तालुक्‍यात सर्व संस्‍थाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या