Ticker

6/Breaking/ticker-posts

'दहावी परीक्षा रद्द' विरोधातील जनहित याचिका; कोर्टाने घेतली दखल

 


*'दहावी परीक्षा रद्द' विरोधातील जनहित याचिकेची मुंबई हायकोर्टाने घेतली दखल

*बुधवारपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे सर्व प्रतिवादींना निर्देश

*  धनंजय कुलकर्णी यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

मुंबई: दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या आणि एसएससी बोर्डाच्या तसेच सीबीएसई, आयसीएसई व आयसीई बोर्डच्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकेची मुंबई हायकोर्टाने दखल घेतली. धनंजय कुलकर्णी यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. अकरावीसाठी सीईटी घेता येत असेल तर दहावीच्या परीक्षा सरकारला का घेता येत नाहीएत असा आक्षेप कुलकर्णी यांनी घेतला आहे.

हायकोर्टाने बुधवारपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे सर्व प्रतिवादींना निर्देश दिले. प्रत्येक बोर्डकडून दहावीच्या मुलांचा निकाल लावताना वेगवेगळे सूत्र लावले जाण्याची शक्यता असल्याने मुलांचे मोठे नुकसान होणार असून केंद्र सरकारने हस्तक्षेप करून योग्य मार्ग काढायला हवा, अन्यथा अकरावीच्या प्रवेशात खूप गोंधळ होऊ शकतो, अशी भीती व्यक्त पुण्यातील धनंजय कुलकर्णी यांनी अॅड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत केली.

केंद्र सरकारचे सीबीएसई बोर्डवर नियंत्रण आहे. मात्र आयसीएसई बोर्ड व इंटरनॅशनल बोर्ड हे स्वायत्त असून त्यावर केंद्र सरकारचे नियंत्रण नाही. त्याचप्रमाणे एसएससी बोर्डवर राज्य सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे केंद्र सरकारला याप्रश्नी हस्तक्षेप करण्याची याचिकेत करण्यात आलेली विनंती चुकीची आहे’, असे म्हणणे केंद्र सरकारच्या वकिलांनी मांडले. तर राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय १२ मे रोजी काढला आहे. निकाल कसा लावायचा याविषयीचे सूत्र अद्याप ठरलेले नाही. समिती याविषयी विचार करून ठरवेल. त्यामुळे ही याचिका अवेळी केलेली आहे’, असे म्हणणे एसएससी बोर्डच्या वकिलांनी मांडले. मग निकाल कधी लावणार? ऑक्टोबरमध्ये लावणार का? अशी विचारणा न्यायमूर्ती शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने केली. तेव्हा समितीकडून सूत्र ठरवण्यात आल्यानंतर निकाल लावण्यात येईल, असे म्हणणे वकिलांनी मांडले. त्यानंतर खंडपीठाने सर्व प्रतिवादींना बुधवारपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश देऊन सुनावणी तहकूब केली.



कोविड-१९ विषाणू संक्रमणग्रस्तांची संख्या दुसऱ्या लाटेत देशभरात वाढत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाने सर्वात आधी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्रानेही विद्यार्थ्यांच्या आरोग्याची प्राथमिकता लक्षात घेऊन दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. या निर्णयाचा अधिकृत जीआर बुधवारी १२ मे रोजी जारी झाला. त्यानंतर तत्काळ गुरुवारी १३ मे रोजी कुलकर्णी यांनी या जीआरला आक्षेप घेत १०वी ची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयास आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या