Ticker

6/Breaking/ticker-posts

पुणे विद्यापीठ उभारणार ऑक्सिजन जनरेशन अँड बॉटलिंग प्लांट

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

पुणे: पुण्यातील करोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑक्सिजन जनरेशन अँड बॉटलिंग प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लांटमधून दररोज १० लिटर क्षमतेचे १०० ऑक्सिजन सिलेंडर भरायला चार आठवड्यात सुरुवात होणार आहे. हा ऑक्सिजन निशुल्क उपलब्ध करुन देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न राहणार आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यातही करोना संसर्गाने प्रकृती खालावलेल्या रुग्णांना ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात लागत आहे. अशा परिस्थितीत मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर अशा महानगरांसोबतच लहान शहरांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे परराज्यातून ऑक्सिजनची गरज भागविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक काम म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुणे शहर आणि जिल्ह्यातील रुग्णांसाठी सिलेंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात गुजरातमधील कंपनीच्या ऑक्सिजन जनरेशन अँड बॉटलिंग प्लांट उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

याबाबत प्रा. एस. जी. घैसास म्हणाले की, विद्यापीठाच्या खडकी गेटजवळील जागेत हा प्लांट येत्या चार आठवड्यात कार्यान्वित करण्याचा प्रयत्न राहणार आहे. सध्या तेथे शेड आणि प्लॅटफॉर्मसारख्या सुविधा उपलब्ध आहे. या प्लांटच्या माध्यमातून १० लीटर क्षमतेचे ५० ते १०० सिलेंडर दररोज भरता येईल. या सिलेंडरचा फायदा ऑक्सिजनची कमतरता असणाऱ्या, शहर किंवा जिल्ह्यातील रुग्णालयातील रुग्णांना होईल. करोनाची तिसरी लाट येण्याबाबत चर्चा सुरू आहेत, अशा परिस्थितीत या प्लांटचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे त्याचा शैक्षणिक दृष्ट्या देखील वापर करण्याचा विचार सुरू असल्याचे प्रा. घैसास यांनी सांगितले.

प्लांटसाठी 'सीएसआर'च्या माध्यमातून निधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ऑक्सिजन जनरेशन अँड बॉटलिंग प्लांट उभारण्यासाठी साधारण २८ लाख रुपये खर्च येणार आहे. या संपूर्ण निधी 'सीएसआर'मधून उभारण्यात येणार आहे. प्लांट कार्यान्वित झाल्यानंतर काही दिवस ऑक्सिजन निशुल्क उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.

ऑक्सिजन जनरेशन अँड बॉटलिंग प्लांट उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन आणि कंपनीकडून एकत्रित प्रयत्न करण्यात येत आहेत. साधारण चार आठवड्यात प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी आशा आहे

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या