Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यातील सर्व विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइनच

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई:-करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध मंडळांनी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या. त्यापाठोपाठ आता राज्यातील १३ अकृषी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी जाहीर केले. कॉलेजांच्या परीक्षेसंदर्भात राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत सामंत यांनी गुरुवारी बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी, 'राज्यात कठोर निर्बंधामुळे ऑफलाइन परीक्षा घेणे अशक्य आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाइन होणार असून, विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही', असे सांगितले.

बहुतांश विद्यापीठांच्या ऑनलाइन परीक्षा सुरूही झाल्या आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सामंत यांनी राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करून विद्यापीठांच्या सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्याचे जाहीर केले. नव्या निर्बंधांमुळे विद्यार्थी घराबाहेर पडू शकणार नाहीत. त्यामुळेच आम्ही सर्वानुमते परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाने १५ एप्रिलपासून ऑनलाइन परीक्षा सुरूही केल्या आहेत. याचबरोबर काही महत्त्वाच्या विद्यापीठांच्या ऑनलाइन परीक्षा सुरू झाल्या आहेत. काही विद्यापीठांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षेचे पर्याय खुले ठेवले होते. मात्र आता ऑफलाइनचा पर्याय ठेवताच येणार नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थांना नुकसान होणार नाही यांची काळजी विद्यापीठ आणि कॉलेजांकडून घेतली जाईल, परीक्षांपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सामंत यांनी विद्यापीठांना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या परीक्षांचा निकाल वेळेवर लागावा यासाठी विद्यापीठातील कुलगुरूंनी उच्च शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी आणि प्राध्यापकांचा अत्यावश्यक सेवामध्ये समावेश करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्य सचिव यांना करण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या