Ticker

6/Breaking/ticker-posts

राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार ह्त्याप्रकरणी केलेले सर्व आरोप फेटाळले..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येप्रकरणी कर्डिले यांनी तनपुरे यांचे नाव घेत आरोप केल्याने खळबळ उडाली असून त्यावरच तनपुरे यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले आहे.

ज्या भूखंडाचा उल्लेख करण्यात येत आहे ती जागा बाबुराव तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेने १९९२ मध्येच खरेदी केली आहे. सोहम प्रॉप्रर्टीज ही फर्म माझ्या मेहुण्याच्या नावे आहे. माझा मुलगा सोहम १४ वर्षांचा असून त्याचा संस्थेशी संबध नाही. मुख्य म्हणजे पत्रकार रोहिदास दातीर व या फर्मचा कोणताही वाद नव्हता. शिवाजी कर्डिले यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले.

कर्डिलेंचे काय आहेत आरोप..
सहा एप्रिल रोजी राहुरीत पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करून हत्या झाली होती. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. पोलिसांचा तपास सुरू असतानाच राहुरीचे माजी आमदार कर्डिले यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी खळबळजनक आरोप केले. पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येची आम्ही इत्यंभूत माहिती घेतली आहे. यात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे की, राहुरीतील १८ एकर भूखंडाच्या मालकीसंबंधी दातीर सतत तक्रार अर्ज करून अडचणी वाढवत असल्याने त्यांनी ही हत्या केली. त्यामुळे आम्ही या भूखंडाची माहिती मिळविली तेव्हा कळले की हा भूखंड पठारे नावाच्या एका शेतकऱ्याच्या नावावर आहे. मात्र नगरपालिकेने तेथे आरक्षण टाकले होते. नंतर हे आरक्षण उठविण्यात आले. त्या जागेत आता सोहम ट्रान्सपोर्ट कंपनी आहे.

 

आम्ही माहिती घेतली की ही कंपनी कोणाची आहे. तर असे आढळून आले की राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावे ही कंपनी असून सोहम त्यांच्या मुलाचे नाव आहे. या कंपनीत तनपुरे यांचे मेहुणे देशमुख आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हे भागिदार आहेत. दातीर यांना पठारे कुटुंबियांनी मुखत्यारपत्र दिले होते. त्या आधारे दातीर या भूखंडासाठी कायदेशीर लढाई लढत होते. यावरून त्यांना मोरे यांच्याकडून अनेकदा धमक्या आल्या होत्या. दातीर यांच्या पत्नीने पोलिसांत तशी तक्रारही दिली होती. मोरे याच्या विरुद्ध दातीर यांनीही अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही. दातीर यांना संरक्षणही दिले नाही, असा आरोप कर्डिले यांनी केला. दातील यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना अटक करण्यात यावी आणि दातीर यांच्या पत्नीला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी करतानाच १५ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही कर्डीले यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या