Ticker

6/Breaking/ticker-posts

'धाकट्या पंढरी'त श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी ; नामघोषाने वरूर नगरी दुमदुमली

 आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची दिवसभर रीघलोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)     


    शेवगाव : ' धाकटी पंढरी ' असा सर्वदूर लौकिक असलेल्या श्रीक्षेत्र वरूर,(ता.शेवगाव) येथे आषाढी  एकादशी भक्तीभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली.दिवसभरात हजारो भाविकांनी सावळ्या श्रीविठ्ठल - रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले. पावसाने उघडीप दिल्याने वरूरला येणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.

      


 वरुरच्या श्रीविठ्ठल - रुक्मिणी मंदिराला पाऊणे चारशे वर्षाचा वैभवशाली इतिहास आहे.  नि:स्सीम विठ्ठलभक्त स्व.अनाजी पाटील खांबट यांच्या पुण्याईने तसेच स्वप्नदृष्टांताप्रमाणे साक्षात विठ्ठल - रुक्मिणी येथे आल्याची आख्यायिका आहे.मंदिरातील वालुकामय मूर्ती स्वयंभू असल्याने वारकरी संप्रदायांमध्ये या स्थानाचे विशेष महत्त्व आहे.आषाढीला ज्या भाविकांना पंढरीला जाणे शक्य होत नाही,अशा भाविकांचे पाय ' धाकट्या पंढरी ' कडे आपोआप वळतात,हे येथील वैशिष्ट्य आहे.

     

ग्रामस्थांनी श्रीक्षेत्र पैठण येथून कावडीने आणलेल्या गोदावरीच्या गंगोदकाचे त्रिवेणी संगमावर भक्त पुंडलिकाच्या सानिध्यात  ग्रामजोशी भागवतदेवा येळीकर यांच्या हस्ते विधिवत पूजन झाले.तर,मुकुंददेवा अंचवले यांच्या हस्ते गंगा आरती झाली . टाळ मृदंगाचा निनाद व विठू नामाच्या जयघोषणात कावडी मंदिरात आल्यानंतर श्रीविठ्ठल - रुक्मिणीला जलाभिषेक व गणेश बेडके व सौ.सोनाली बेडके यांच्या हस्ते लघुरुद्र अभिषेक घालण्यात आला.दिलीपदेवा अंचवले यांनी पौरोहित्य केले.

      

नगर प्रदक्षिणा व रिंगण सोहळ्यासाठी गावोगावच्या दिंड्या वरूरमध्ये दाखल झाल्या होत्या. सायंकाळी आखेगावचे जोग महाराज सेवा संस्थानचे महंत वैराग्यमूर्ती राम महाराज झिंजुर्के यांचे अधिपत्याखाली भव्यदिव्य व डोळ्याचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा पार पडला.रात्री संस्थानप्रमुख तथा प्रसिद्ध भागवताचार्य दिनकर महाराज अंचवले यांचे कीर्तन झाले.

      

 ताजनापुर येथील श्रीदत्त आश्रमाचे महंत प.पू.बालयोगीजी महाराज, आ. मोनिका राजळे व त्यांचे चिरंजीव कृष्णा राजळे, भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंढे, परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी,डीवायएसपी सुनील पाटील, आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अँड.शिवाजी काकडे व सौ.हर्षदा काकडे,संघर्षयोद्धा श्री. बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन माधव काटे,समर्थ ग्रुपचे अध्यक्ष संजय फडके यांनी सावळ्या श्रीविठुरायाचे दर्शन घेतले.वरुर येथील विविध तरुण मंडळाच्या वतीने जागोजागी मोफत साबुदाणा खिचडीचे स्टॉल लावण्यात आले होते.पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.उत्सव यशस्वीतेसाठी ग्रामस्थ तसेच तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.पोलीस निरीक्षक विलास पुजारी,सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर गावंडे यांचे मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात चोख बंदोबस्त तैनात होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या