Ticker

6/Breaking/ticker-posts

मर्चंट नेव्हीत नोकरी :आमिषापोटी लाखो रुपयांची फसवणूक

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 नवी मुंबई : मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून एका टोळीने अनेक बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये उकळून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या १७ तरुणांनी आत्तापर्यंत पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र या प्रकरणात फसवणूक झालेल्यांची संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वाशी पोलिस ठाण्यात या टोळीतील तिघांविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाच्या पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्यामध्ये आदर्श पांडे (३५), मन्सूर अन्सार (४५) व पियू शर्मा (२८) या तिघांचा समावेश असून या त्रिकुटाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वाशीतील हावरे फॅटासिया बिझनेस पार्क इमारतीतील नॅनो विंगमध्ये अॅक्वारियर्स मरिन सर्व्हिसेस नावाने कार्यालय थाटले होते. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळवून देण्याबाबतची जाहिरातबाजी केली होती. या जाहिरातबाजीला भुलून महाराष्ट्रासह परराज्यांतील अनेक बेरोजगार तरुणांनी या टोळीच्या कार्यालयात संपर्क साधला होता. त्यानंतर या टोळीने या तरुणांना मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी एक ते सव्वा लाखांची रक्कम उकळली.

कार्यालय बंद करून पोबारा...

या टोळीने सदर तरुणांकडून पासपोर्ट, सीडीसी मूळ कागदपत्रेसुद्धा घेतली. पैसे व कागदपत्रे घेतल्यानंतरही त्यांनी नोकरी मिळवून देण्यासाठी काहीच केले नाही. काही तरुणांकडून नोकरीसाठी विचारणा होऊ लागल्यानंतर या टोळीने वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही तरुणांनी पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे या टोळीने वाशीतील आपले कार्यालय बंद करून पलायन केले. त्यानंतर यातील १७ बेरोजगार तरुणांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या