Ticker

6/Breaking/ticker-posts

मास्क नसणारे, थुकणाऱ्यांकडून सुमारे २७ कोटीचा दंड वसूल..

 



 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

पुणे:-करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क न घालणारे आणि रस्त्यांवर थुंकणाऱ्यांविरूद्ध जोमाने मोहीम सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत पाच लाख ४३ हजार नागरिकांविरूद्ध कारवाई होऊन सुमारे २६ कोटी ९९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मास्क न घालणारे; तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकून बेशिस्त वर्तन करण्यात पुण्यातील नागरिकांची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळून आले असून, त्यानंतर ग्रामीण भागातील नागरिक आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे

 

मास्क न घालणाऱ्या नागरिकांना पहिल्यांदा पाचशे रुपये, तर दुसऱ्यांना मास्क न घातल्याचे आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरूद्ध एक हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ही मोहीम जोमाने सुरू आहे. दंडाची रक्कम वसूल करण्याची कारवाई पोलिस आणि महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत करण्यात येत आहे.नियमांचे उल्लंघन करण्यामध्ये पुण्यातील नागरिकांची संख्या सर्वांत जास्त आहे. त्याखालोखाल ग्रामीण भागातील नागरिक आहेत. त्यानतंर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

 

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘मास्क न घालणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत पुणे शहरामधील दोन लाख ३९ हजार नागरिकांविरूद्ध कारवाई झाली असून, त्यांच्याकडून सुमारे १७ कोटी ९४ लाख रुपये दंड वसूल झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दोन लाख ३६ हजार नागरिकांवर कारवाई करून सुमारे पाच कोटी ३३ लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ६८ हजार २०० नागरिकांविरूद्ध कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे तीन कोटी ७२ लाख रुपये दंड वसूल झाला आहे. आतापर्यंत कारवाई झालेल्या नागरिकांची संख्या पाच लाख ४३ हजार झाली असून, त्यांच्याकडून सुमारे २६ कोटी ९९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या