Ticker

6/Breaking/ticker-posts

कर्जत-जामखेडवर आता पवारांची ‘कमांड’

अहमदनगर: ग्रामीण भागातील राजकारणाची पकड मजबूत करण्यासाठी मतदारसंघातील साखर कारखाना महत्त्वाचा मानला जातो. त्या दृष्टीने राष्ट्रवादीचे आ. रोहित पवारांच्या 'बारामती ग्रो' या संस्थेला हा कारखाना भाडेतत्वावर चालविण्यासाठी मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिपत्याखालील अंबालिका शुगर हा खासगी साखर कारखाना या मतदारसंघात आधीपासूनच आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्याच्या राजकरणावर  आता पवार कुटुंबाची कमांड निर्माण होणार आहे .

गेल्या काही वर्षांपासून करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना आर्थिक अचणीत होता. तो भाडेतत्वावर चालविण्यासाठी मुंबईत लिलाव झाला. याची बोली पवारांच्या 'बारामती ग्रो'ने जिंकली आहे. पवारांनी हा कारखाना २५ वर्षांसाठी ६ कोटीला भाडे तत्वावर घेतला आहे. यामुळे आ. रोहित पवार यांचे राजकारण अधिक मजबूत होणार असून बंद पडलेला कारखाना सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांचीही सोय होणार आहे. पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील २५ गावे या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतात.. कर्जाच्या परतफेडीसाठी दर टनामागे शंभर रुपये द्यायचे आहेत. कारखान्यातील कामगारांचा पगार, मेंटेनन्स आणि नवीन उपक्रम हे स्वतःच्या खर्चाने करावे लागणार आहेत. मंगळवारी, १२ जानेवारी रोजी मुंबईत राज्य सहकारी बँकेच्या कार्यालयात झालेल्या लिलाव प्रक्रियेत हा कारखाना पवार यांच्या बारामती ग्रोला देण्यात आला आहे.

आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत- जामखेडमधील २५ गावांचे कार्यक्षेत्र आदिनाथ कारखान्याच्या हद्दीत येते. त्याचा फायदा पवार यांचे राजकारण अधिक घट्ट होण्यात होणार आहे. या परिसरातील जुना जगदंबा सहकारी साखर कारखाना विकण्यात आला. तोही पूर्वीच पवार कुटुंबीयांच्या अधिपत्याखालील कंपनीने घेतला असून आता अंबालिका शुगरचा या भागात मोठा विस्तार झाला आहे. तेथे साखर कारखान्यासोबतच अन्य उप-उत्पादनेही घेण्यात येत आहे. बहुतांश ऊस पट्टा असलेल्या कर्जत तालुक्यात राजकारणावर पकड असण्यासाठी साखर कारखाना ताब्यात असणे आवश्यक असते. मागील विधानसभा निवडणुकीतही साखर कारखाना हा मुद्दा प्रचारात आला होता. त्यामुळे पवार यांचे प्रतिस्पर्धी माजी मत्री राम शिंदे यांनी आपणही लवकरच या भागात खासगी साखर कारखाना काढणार असल्याची घोषणा केली होती. पवार कुटुंबीयांचा कर्जत-जामखेड मतदारसंघात खासगी साखर कारखान्याच्या माध्यमातूनच प्रवेश झाला आहे. आता याच मतदार संघालगत दुसरा कारखानाही त्यांच्या हाती आला आहे. बारामती ग्रोच्या माध्यमातून रोहित पवार तसेच त्यांच्या मातोश्री सुनंदा पवार याही मतदासंघात विविध उपक्रम राबवत संपर्क ठेवून आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना आता नव्या साखर कारखान्यामुळे अधिक बळ येणार आहे. शिवाय कारखाना खासगी झाल्याने त्यासंबंधीचे राजकारणही संपुष्टात येणार आहे. उत्तर नगर जिल्ह्याच्या धर्तीवर राजकरणात लॉन्ग टर्म खेळी खेळण्यासाठी ज्यांची आहे  साखर कारखान्यावर मांड त्यांनाच असते कायम डिमांड अन त्यांचीक असते तालुक्याच्या राजकरणावर कमांड” या उक्तीचा प्रत्यय पवार कुटुंबीयांसह येथील जनतेला येणार  आहे .  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या