..नगरी कचरा थेट बंगालच्या उपसागरात; २० कि.मी.पर्यंत पसरलाय धूर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर : स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा च्या बॅनरखाली फोटो काढायचे आणि रात्री कचरा जाळायचा - महानगरपालिकेचा हा दुटप्पीपणा आता उघड झाला आहे. शहरापासून ८ किमी वरील बुरुडगाव कचरा डेपोला ९ जूनपासून लागलेली आग आज ३० वा दिवस उलटूनही विझलेली नाही. विशेष म्हणजे मागे ४ दिवस पडलेल्या पावसात देखील ही आग विझलेली नाही यावरून त्या आगीची भीषणता स्पष्ट होते. १५ याठिकाणी एकर परिसरात ६०-७० फूट उंचीचे कचर्याचे ढीग साचले आहेत. अनेक ढीग पेटले आहेत, धगधगत आहेत. त्यातून निघणारा काळा, विषारी धूर चांदबीबी महालावरून २० किलोमीटर दूरवरूनही दिसत आहे.
प्लास्टिकसह कचरा जाळल्याने हवेत कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनोक्साइड, सल्फर डायऑक्साइड, हायड्रोजन साईनाइड आणि डायोक्सिनसारखी घातक रसायने सोडली जात आहेत. तज्ज्ञांच्या मते यामुळे दमा, हृदयविकार, किडनीचे आजार आणि कॅन्सरसारखे गंभीर रोग होऊ शकतात. तरीही येथील कर्मचारी आणि ग्रामस्थांना कोणतीही आरोग्य सुविधा किंवा इशारा देण्यात आलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे डेपोतील कचरा बेकायदेशीरपणे मेंढका नदीच्या पात्रात टाकला जात आहे. आतापर्यंत ३०० हून अधिक डंपर कचरा येथे टाकण्यात आला आहे. त्यापैकी २०० डंपर जाळण्यात आले आहेत. पावसात ही राख व कचरा वाहत सीना-भीमा-कृष्णा नदीतून थेट २००० किमी दूर बंगालच्या उपसागरात पोहोचणार आहे. म्हणजे अहिल्यानगरच्या निष्काळजीपणाचे प्रदूषण आता राष्ट्रीय समस्या बनले आहे. तसेच निसर्गात इतरही अनेक ठिकाणी बेकायदेशीर व अशास्त्रीयरित्या शेकडो डंपर कचरा टाकण्यात येत आहे.
ओला-सुका कचरा वेगळा न केल्याने रीसाइक्लिगं होतच नाही. शेवटी तो जाळला जातो. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून अनेकदा तक्रारी करूनही घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संदेश कपाळे, मनोज कदम, तुषार लहारे, वसंत कर्डिले, मधुकर टोणे आदी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केला आहे. या पर्यावरणदृष्ट्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देत त्वरित आग विझवणे, दोषी अधिकार्यांचे निलंबन, स्वतंत्र तज्ञ समिती आणि स्थानिकांना आरोग्य - भरपाई मदत देण्याची मागणी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास राष्ट्रीय स्तरावर प्रदूषण नियामक मंडळाकडे आणि उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी यांनी दिला आहे.
----
चौकट : गांभीर्य जाणून उपाययोजना करा
नागरिकांनी ओला-सुका वेगळा करून पालिका प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासनाने त्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. कचरा जाळणे म्हणजे समस्या संपवणे नाही. तो आपल्या हवा, पाण्यावाटे रक्तात मिसळतो. त्याचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. मात्र, कचरा डेपोला लागणारी आग ही प्रशासन पुरस्कृत आहे की काय? अशी शंका उपस्थित होते. या पर्यावरणीय समस्येकडे गांभीर्याने बघणे आणि त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.
-----------

0 टिप्पण्या