Ticker

6/Breaking/ticker-posts

कुतुबमिनारवर झळकले हिवरे बाजारचे विकास मॉडेल !



पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाला हिवरेबाजार ..चेंज मेकर्स.. राष्ट्रीय स्तरावर




लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  

नवी दिल्ली :  पद्मश्री पोपटराव पवार यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि हिवरे बाजार ग्रामस्थांच्या एकजुटीच्या बळावर उभ्या राहिलेल्या आदर्श ग्रामविकास मॉडेलची दखल आता देशाच्या राजधानीतही घेण्यात आली आहे. दिल्लीतील ऐतिहासिक कुतुबमिनार येथे सादर करण्यात येणार्‍या अत्याधुनिक लेझर शोमध्ये भारतातील समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणार्‍या ’चेंज मेकर्स’ तसेच प्रेरणादायी व्यक्ती, संस्था आणि गावांच्या कार्याची माहिती पर्यटकांना दाखविली जाते. या प्रतिष्ठित चित्रफितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरे बाजार गावाचा समावेश करण्यात आला असून, ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.

देश-विदेशातून दररोज हजारो पर्यटक कुतुबमिनारला भेट देतात. या पर्यटकांना भारतातील प्रेरणादायी विकासकथा आणि सामाजिक परिवर्तनाची उदाहरणे लेझर शोच्या माध्यमातून अनुभवता येतात. त्यामध्ये हिवरे बाजारने जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, लोकसहभाग आणि शाश्वत ग्रामविकासाच्या माध्यमातून घडवून आणलेला परिवर्तनाचा प्रवास प्रभावीपणे सादर करण्यात आला आहे.

चित्रफितीत पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या जलसंधारणाच्या विविध उपक्रमांची, पावसाच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन, भूजल पुनर्भरण, वृक्षसंवर्धन, दुष्काळावर मात करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची तसेच ग्रामसभेच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवत गावाचा सर्वांगीण विकास साधल्याची माहिती देण्यात आली आहे. एकेकाळी दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि स्थलांतर यांसारख्या गंभीर समस्यांनी ग्रासलेले हिवरे बाजार आज देशातील आदर्श गाव म्हणून ओळखले जाते.

हिवरे बाजारच्या या उल्लेखामुळे केवळ गावाचाच नव्हे, तर अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्य व देशाचा नावलौकिक देशभर पोहोचला आहे. ग्रामीण विकास, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणार्‍या हिवरे बाजारच्या कार्याला मिळालेली ही राष्ट्रीय पातळीवरील आणखी एक मोठी दाद मानली जात आहे.

----

चौकट--कुतुबमिनारवर हिवरे बाजारची यशोगाथा


दिल्लीतील कुतुबमिनार येथे दररोज सादर होणार्‍या लेझर शोमध्ये भारतातील प्रेरणादायी व्यक्ती, संस्था आणि गावांच्या यशोगाथा दाखविल्या जातात. देश-विदेशातील हजारो पर्यटक हा शो पाहतात. या चित्रफितीत हिवरे बाजारच्या जलसंधारण, पाणी नियोजन, लोकसहभाग आणि शाश्वत ग्रामविकासाच्या कार्याचा समावेश झाल्याने गावाच्या विकास मॉडेलला राष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे.

चौकट- दुष्काळग्रस्त खेडं ते आदर्शगांव

एकेकाळी दुष्काळ, पाणीटंचाई आणि स्थलांतरासाठी ओळखले जाणारे हिवरे बाजार आज देशातील आदर्श गावांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली जलसंधारण, वृक्षसंवर्धन, पाणी नियोजन, श्रमदान आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गावाने विकासाची नवी दिशा निर्माण केली. आज हिवरे बाजारचे विकास मॉडेल देशातील अनेक राज्यांसाठी अभ्यासाचा आणि प्रेरणेचा विषय बनले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या