Ticker

6/Breaking/ticker-posts

आमदार अक्षय कर्डिले यांचा जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा मार्ग मोकळा


 समर्थनार्थ तालुक्यातील १०७ सोसायट्यांचे ठराव ; बिनविरोध निवडीच्या चर्चेला वेग 



 लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)           

अहिल्यानगर- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीची रंगीत तालीम सुरू असून नगर तालुक्यातील सोसायटी मतदारसंघात आमदार अक्षय कर्डिले यांचे पारडे सध्या तरी जड दिसू लागले आहे . तालुक्यातील १०९ सहकारी संस्थांपैकी तब्बल १०७ सोसायट्यांनी मतदानासाठी ठराव मंजूर केले आहेत. यातील बहुतांशी संस्थांमध्ये आ. कर्डिले समर्थकांचे वर्चस्व आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालकपदी पुन्हा एकदा आमदार अक्षय कर्डिले यांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

नगर तालुक्यातील  इमामपूर व नांदगाव येथील दोन संस्थांचे ठराव अद्याप झालेले नाहीत. त्यामागे कोरमचे कारण सांगितले जात आहे. मात्र या घडामोडींमागे राजकीय समीकरणे असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. स्वण आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी ग्रामपंचायत, सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बराच काळ एकहाती रणनीती आखत ग्रामीण भागावर आपली पकड मजबूत केली होती. त्याचाच परिणाम आजही नगर तालुक्यातील सुमारे ९०% सहकारी संस्थांवर कर्डिले गटाचे वर्चस्व अबाधित आहे. गाव पातळीवर भक्कम संघटनाच्या जोरावर स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दीर्घकाळ जिल्हा बँकेचे संचालकपद भूषवतानाच अध्यक्षपदालाही गवसणी घातली होती. 

स्थानिक निवडणुकांमध्ये स्व. कर्डिलेंच्या विरोधात महाविकास आघाडी सातत्याने एकत्र येत गेली. मात्र सध्याच्या घडीला स्थानिक पातळीवर विरोधकांमध्ये एकीचा आणि नेतृत्वाचा अभाव असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आमदार अक्षय कर्डिले यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार कोण? याबाबत तर्क-वितर्क वर्तविले जात आहेत. बुरानगर सेवा सोसायटीने आमदार कर्डिले यांच्या समर्थनाचा ठराव मंजूर केल्याने त्यांच्या उमेदवारीवर एक प्रकारे जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते. विरोधक उमेदवारी दाखल करून लढत रंगवतात की, अक्षय कर्डिले यांची बिनविरोध निवड होते याकडे आता जिल्ह्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या