Ticker

6/Breaking/ticker-posts

बाजार समित्यांच्या बळकटीकरणांसाठी निधी देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

 
वांबोरीत १५ एकर जागेत अद्ययावत जिनिंग मिल 

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  नवीन इमारतीचे लोकार्पण

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)    
राहुरी-  राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान,  यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. यासाठी शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन व उपहारगृहाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार काशीनाथ दाते, माजी आमदार लहू कानडे, कैलास पाटील, डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अॅड. केरू पानसरे, बाजार समितीचे सभापती अरुणराव तनपुरे, हर्ष तनपुरे, राजेंद्र नागवडे, अशोक सावंत, कपिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, . शासनाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेतीमध्ये वाढवण्यासाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे उत्पादन वाढविण्याचा विचार शेतकऱ्यांनी करावा. शेतीमध्ये फळबाग लागवड, तीन पिकांनंतर ऊसाच्या बियाण्यात बदल, आणि शाश्वत पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. 

शासनाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी २० लाख घरे मंजूर केली असून या घरांच्या बांधकामासाठी ५ ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. लाडकी बहिण योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ४५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, या योजनेचा लाभ केवळ अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील बहीणींनाच मिळणार आहे; नोकरदार कुटुंबांतील सदस्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये, असेही आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

श्री.पवार म्हणाले, राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरविण्यासाठी २० हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. 

केंद्र शासनाने पुणे – अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गास मंजुरी दिली असून, भूसंपादन प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येणार असून, त्यांना योग्य मोबदला देण्यात येईल. या मार्गामुळे शेतमालाची वाहतूक सुलभ होणार आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. याठिकाणी सुसज्ज टर्मिनलसाठीही मंजुरी मिळालेली असून, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांद्वारे देश-विदेशातील भाविक शिर्डीत येऊ शकणार आहेत. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.
राहूरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचे कौतूक करतांना उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, राज्यातील उत्कृष्ट पहिल्या दहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये राहुरी बाजार समितीचा समावेश असून, लवकरच वाबोरी येथे १५ एकर जागेत अद्ययावत जिनिंग मिल सुरू करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, शेतकरी भवन व उपहारगृह इमारतीचे बांधकाम १ कोटी ८० लाख रुपये खर्चून करण्यात आले असून, समितीकडे १९ कोटी रुपयांचे ठेवी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या