Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगावचे भाजपा कार्यकर्ते सुनील रासने यांच्या हाती बंडाचा झेंडा ..!


लोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 


        (जगन्नाथ गोसावी) 
    शेवगाव : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेवगावचे भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते तसेच भाजपा ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनील उर्फ बंडूशेठ रासने यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने भाजपाच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.श्री.रासने यांच्या राजीनाम्याचे नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

दरम्यान,त्यांनी या राजीनाम्याचे खापर नगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर फोडल्याचे स्पष्ट झाले आहे.भाजपाचे आणखी १०० कार्यकर्ते आपापल्या पदाचे राजीनामा देणार असल्याचे सुतोवाच श्री.रासने यांनी मुंबईत प्रसार माध्यमांसमोर केले. 


    श्री.रासने भाजपाचे दिवंगत खासदार दिलीप गांधी,माजी आमदार राजीव राजळे व शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.काही काळ त्यांनी दिवंगत खासदार तुकाराम गडाख तसेच राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील व श्री.चंद्रशेखर घुले पाटील यांची सोबत केली.मात्र,ते तेथे फारसे रमले नाहीत.पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला.    अगदी अलीकडे नव्याने निवड झालेल्या भाजपा शेवगाव तालुका अध्यक्ष पदाच्या शर्यतीत ते होते.मात्र,या पदावर भाजपाचे प्रदेश सचिव श्री.अरुण मुंडे यांचे निकटवर्तीय बालमटाकळीचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री.तुषार वैद्य यांची वर्णी लागली.त्यामुळे श्री.रासने सहा महिन्यापासून अस्वस्थ होते.त्यातच त्यांची स्थानिक पातळीवर भाजपात होणारी घुसमट हे राजीनाम्याचे मुख्य कारण असल्याचे समजते.

     
श्री.रासने यांची काही दिवसापासून पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार व लोकसभेचे उमेदवार डॉ.निलेश लंके यांच्याशी जवळीक वाढली,हे सत्य नाकारून चालणार नाही.श्री.लंके यांनी श्री.रासने यांच्या वाढदिवसाला हजेरी लावल्याचा बोलबाला आहे.रासने -  लंके यांच्या जवळीकीची कल्पना भाजपा पक्ष धुरीनांना होती.मात्र,त्यांनी त्याची फारशी वाच्यता कुठे केली नाही.


     भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांना सादर केलेल्या राजीनामा पत्रात श्री. रासने यांनी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान,श्री.रासने यांनी ऐन लोकसभा निवडणुकीचे टाइमिंग सादर बंडाचा झेंडा हाती घेतल्याने त्यांचा बोलविता धनी  व पडद्यामागील सूत्रधार कोण ? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.श्री.रासने यांच्या राजीनाम्याचे नगर दक्षिण लोकसभा मतदार  संघात  विशेषत: शेवगाव तालुक्यात 'इफेक्ट' ची  शक्यता नाकारता येत नाही, त्यामूळे विखे यांची डोकेदुखी वाढणार,हे मात्र निश्चित.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या