Ticker

6/Breaking/ticker-posts

सध्या तरी.., ग्रंथ हेच खरे दान : डॉ. संजय कळमकर

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  

नगर/  शेवगाव ( प्रतिनिधी): - पुस्तक म्हणजे प्रतिभावंतांची, विचारवंतांची फुललेली स्वप्न असतात, या स्वप्नातूनच उद्याचं वास्तव जन्माला येत असतं, म्हणून जगातल्या सौंदर्यपूर्णआणि स्वयंपूर्ण वस्तूमध्ये  पुस्तकांचा समावेश होत असून.  ग्रंथ दान हेच सध्याच्या ( सोशल मीडियामुळे दिशाहीन झालेल्या )  तमाम समाजासाठी खरे दान असल्याचे मार्मिक  प्रतिपादन ज्येष्ठ विनोदी आणि मर्मभेदी साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी केले .


ते संस्कृती मंत्रालय, भारत सरकार व राजा राममोहन रॉय  ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्ता , उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचलनालय ,जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमान केरळ राज्यातील ग्रंथालय व साक्षरता चळवळीचे जनक श्री पी एन पणिक्कर  यांच्या स्मृती व सन्मान प्रित्यर्थ राष्ट्रीय वाचन दिन समारोप कार्यक्रम श्री नृसिंह  विद्यालय , चास येथील ग्रंथदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .


ते पुढे म्हणाले की , पुस्तक ही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात .दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे पुस्तक मनात दरवळत राहतात. जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तक ही जगण्याची हिंमत वाढवतात, प्रेरणा देतात. माणसाच्या जडणघडणीत पुस्तकाचे योगदान खूप मोठे आहे. सध्याच्या युगात दानाचे मोठे महत्त्व आहे, परंतु त्याचे सर्वप्रथम ज्ञान तर हवे, ज्ञान देण्याचे काम खर्या अर्थाने ग्रंथ करतात. त्यामुळे त्यांचेकडे आधी ग्रंथ हवेत, म्हणूनच ग्रंथ  हे त्यांना दान देण्याची गरज आहे.  विद्यार्थ्यांनी अधिकाधिक पुस्तके वाचून ज्ञान संपन्न व्हावे असे आवाहन डॉ. कळमकर यांनी केले.


अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री किशोर मरकड होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथ वाचनाचे महत्त्व सांगून पालक व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या वाचन सवयीचा विकास केला पाहिजे असा आग्रह त्यांनी व्यक्त केला. 


  यावेळी जिल्हा वाचनालयाचे  ग्रंथपाल अमोल इथापे , निरीक्षक रामदास शिंदे ,श्री रंगनाथ सुंबे, वर्षा पडवळ, वसंत कर्डिले  आदी  उपस्थित होते. प्रारंभि केरळ राज्याचे साक्षरतेचे जनक श्री पी एन पणिक्कर  यांच्या प्रतिमेस पुष्पहार डॉ कळमकर यांच्या हस्ते अर्पण केला. मुख्याध्यापिका सौ. कमल घोडके यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले .प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी केले . त्यात त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना दिलेल्या पुस्तकांचे दररोज अभिवाचन करावे व वाचन संस्कृती वाढीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन  केले.


 यावेळी साडेचारशे विद्यार्थी शिक्षक यांना ग्रंथ भेट देण्यात आले. आभार प्रदर्शन श्री आदम शेख यांनी केले .तर सूत्रसंचालन कवी श्रीमती स्वाती अहिरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  तांत्रिक सहायक हनुमान ढाकणे , संतोष कापसे , शैलेश घेगडमल , आशिष आचारी ,भाग्यश्री वेताळ ,पुष्पवर्षा भिंगारे ,कल्पना ठुबे , आठवे आशा आरडे , आशंका मुळे, ग्रंथपाल मंजुषा दरेकर आदींसह  शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी प्रयत्नशील होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या