Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर अर्बनच्या चेअरमनपदी ज्येष्ठ संचालक अशोक कटारिया बिनविरोध; बँक पूर्वपदावर येईल -आ. नीलेश लंके

 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  

नगर - पारनेरकरांना पदाची संधी मिळाल्यावर ते संधीचे सोनं करून मिळालेल्या पदाला योग्य न्याय देत असतात. अर्बन बँकेसारख्या ऐतिहासिक बँकेच्या चेअरमनपदी अशोक कटारिया यांची निवड झाल्याची घटना पारनेरच्या इतिहासात सोनेरी क्षणांची आहे. अर्बन बँकेवर काहीजण वक्रदृष्टी ठेवत त्रास देत आहेत. मात्र, त्यांच्याकडे लक्ष न देता संचालक मंडळाने चांगले काम करावे. अशोक कटारिया यांच्यासारखे अनुभवी व्यक्तिमत्व बँकेच्या चेअरमनपदी विराजमान झाल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली अर्बन बँक निश्‍चित पूर्वपदावर येईल, असा विश्‍वास आ. नीलेश लंके यांनी व्यक्त केला.

 

नगर अर्बन बँकेच्या नूतन चेअरमनपदी ज्येष्ठ संचालक अशोक कटारिया यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. प्रभारी चेअरमन दीप्ती गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली. निवड झाल्यावर आ. लंके यांच्या हस्ते श्री. कटारिया यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अंगारिका चतुर्थीच्या मुहूर्तावर नूतन चेअरमन अशोक कटारिया यांनी आ.निलेश लंके यांच्या उपस्थितीत पदभार घेवून कामास सुरवात केली.

 

याप्रसंगी बँकेचे संचालक अनिल कोठारी, अजय बोरा, मनेष साठे, ईश्‍वर बोरा, राहुल जामगांवकर, गिरीश लाहोटी, संगीता कोठारी, संगीता गांधी, संपत बोरा, सचिन देसरडा, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. साळवे आदी यावेळी उपस्थित होते.

 

चेअरमन अशोक कटारिया म्हणाले की, अर्बन बँकेचे मोठ्या प्रमाणात कर्ज थकित आहे. मात्र, आमच्यात कर्जवसुलीची धमक असल्याने थकित कर्जदारांकडून  आम्ही कर्जवसुली करीत आहोत. थकित कर्जदारांना आम्ही सोडणार नाही. अर्बन बँकेत काम करताना स्वाभिमानाने काम करीत आहोत. कोणाच्या रुपयाचा लाजिणदार नाही. भविष्यात सर्वांच्या सहकार्याने अर्बन बँकेला निर्बंधमुक्त करून पुर्नवैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प केला आहे. संचालक मंडळाने टाकलेल्या विश्‍वासाला तडा जाऊ न देता उत्कृष्ट काम करून दाखवेल, असे सांगितले.


अनिल कोठारी म्हणाले की, अर्बन बँकेकडे थकित कर्जवसुली करणे हेच महत्त्वाचे व मुख्य काम आहे. कर्जदारांवर कारवाई करून कर्जवसुली केली जात आहे. त्यामुळे अर्बन बँक लवकरच पूर्वपदावर येईल.

 

सहकार पॅनेलचे नेते सुवेंद्र गांधी म्हणाले की, मोठी ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असलेल्या अर्बन बँकेच्या चेअरमनपदी सगळ्यांत अनुभवी व सहकारातील जाणकार अशोक कटारिया यांची निवड झाल्याने निश्‍चितच अर्बन बँकेला पुर्नवैभव मिळेल. निवडणुकीतून पळ काढणारे विरोधक फक्त फेसबुकवरच बोलतात. त्यांच्या आरोपांना कामातून उत्तर दिले जात आहे. अर्बन बँकेने एकही बोगस अथवा चुकीचे कर्ज दिलेले नाही. सर्व दिलेले कर्ज रितसर आहेत, हे कोर्टात सिद्ध झाले आहे. त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जवसुली झाली आहे.

 

यावेळी संचालक संचालक ईश्‍वर बोरा, राहुल जामगांवकर, संपत बोरा, अजय बोरा, गिरीश लाहोटी, माजी संचालक दीपक गांधी, मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी, रवी कोठारी, एन. पी. साळवे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सेन्ट्रल बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड.सुभाष काकडे, पोपट भंडारी, डॉ.विजय भंडारी आदींसह पारनेर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या