Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगाव तहसील कार्यालयात नेमकं चाललं तरी काय ? लिपिक हरेश्वर सानप पाठोपाठ मनोज जाधव लाचेच्या आरोपावरून एसीबीच्या जाळ्यात

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 शेवगाव :  दि.६ सप्टेम्बर २०२२

शेवगाव : शेवगाव तहसील कार्यालयातील गौण खनिज विभागाचा लिपिक हरेश्वर सानप यास (दिं.२७ जुलै २०२२)नाशिकच्या एसीबी पथकाने ५० हजार रुपयांच्या लाचेच्या मागणीवरून गुन्हा दाखल केला. ही घटना ताजी असतानाच याच विभागाचा दुसरा लिपिक मनोज जाधव एसीबीच्या गळाला लागला असून पाचशे रुपयाची लाच मागितल्याच्या आरोपावरून शेवगाव पोलीस स्टेशनला मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला तसेच दुसऱ्या एका घटनेत पोलिसांनी लॉजवरील जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत गणेश वावरे नामक तलाठी अडकले.त्यामुळे शेवगाव तहसील कार्यालयाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर आली आहेत.शेवगाव तहसील कार्यालयात नेमकं चाललं तरी काय ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्यास नवल वाटू नये.

  पहिल्या घटनेत सन २०२० मध्ये फिर्यादीचा जप्त केलेला वाळूचा डंपर सोडवण्यासाठी न्यायालयाने तहसीलदारांचा सीए मागवला होता, तो देण्यासाठी लिपिक सानप याने फिर्यादीकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ५० हजार रुपये लाच घेण्याचे तडजोडीतून ठरले. हा प्रकार जुलैच्या अखेरीस घडला घडला. आता गौण खनिज विभागाचा दुसरा लिपिक मनोज जाधव अशाच कारणावरून एसीबीच्या जाळ्यात अडकला. यातील फिर्यादी शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथील आहे. सलग दुसऱ्यांदा घडलेल्या या प्रकारामुळे शेवगाव तहसील कार्यालयाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर आली आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्याच्या संमतीशिवाय लिपिक दर्जाचे कर्मचारी हे धाडस करू शकत नाही, हे उघड सत्य आहे.

 शेवगाव तहसील कार्यालय या व इतर कारणांमुळे गेल्या अनेक वर्षापासून सततच चर्चेत राहिले आहे. कार्यालयाच्या प्रत्येक विभागात चिरीमिरी घेतल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. मात्र,तहसीलदार हातावर हात ठेवून फुकटचा तमाशा पाहत आहेत.आज सर्वाधिक भ्रष्टाचार पुरवठा विभागात सुरू आहे. त्या खालोखाल गौण खनिज विभागाचा क्रमांक लागतो. शेवगाव व ग्रामीण भागातील निवडक सजेतील तलाठी जनतेची सर्रासपणे आर्थिक लूट करत आहेत.रस्ते केसचा टेबल सांभाळणारा कर्मचारी मालामाल झाला असून तो स्वतःला तहसीलदार समजतो.तर,अन्य एका कर्मचाऱ्याची केबिन तहसीलदारांना लाजविणारी आहे.

  शेवगाव तालुक्यात वाळू तस्करीतून दरमहा लाखो रुपये गोळा केले जातात. महसूल व पोलीस यंत्रणेला त्यासाठी मोठी बिदागी ? मिळते. हप्ते वसुलीसाठी मध्यंतरी एका खाजगी व्यक्तीची नेमणूक करण्यात आली, हे कटू सत्य आहे. एलसीबी, डीवायएसपी ऑफिस तसेच शेवगाव पोलीस स्टेशनला हप्ते वसुलीसाठी खास मर्जीतील निवडक कर्मचाऱ्यांच्या नेमणूका आहेत.  जिल्हाधिकाऱी डॉ.राजेंद्र भोसले यांनी शेवगाव तहसील कार्यालयातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्या कराव्यात तसेच याबाबत आमदार मोनिका राजळे यांनी पुढाकार घ्यावा,अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या