Ticker

6/Breaking/ticker-posts

स्वामी गोविंदगिरी महाराज यंदाच्या आनंदोत्सवच्या जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी

 



१६ सप्टेंबर रोजी होणार नगर येथे पुरस्कार वितरण



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)



  नगर -    अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष व मथुराच्या श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष विद्यावाचस्पती स्वामी गोविंदगिरी महाराज (आचार्य किशोरजी व्यास)  यांना  अध्यात्मिक व साहित्यिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या नगरच्या आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यंदाचा 'जीवन गौरव पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. 


श्री ज्ञानेश्वरी जयंतीच्या सुमुहूर्तावर शुक्रवार दि.१६ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४:३० वाजता सावेडी येथील माऊली सभागृह येथे हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. 

सनातन सांस्कृतिक अखंड भारताच्या पुनरुत्थानासाठी, संकल्पासह कटिबद्ध झालेल्या प्रज्ञावान व्यक्ती तसेच अध्यात्म व  राष्ट्रनिष्ठा जपत राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेल्या व्यक्तिमत्वांना अध्यात्मिक व साहित्यिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या नगरच्या आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा 'जीवन गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येते. 


यंदाचे मानकरी स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी नगर मधून आपल्या अध्यात्मिक कार्यास सुरवात करून आज ते राष्ट्रहिता साठी भरीव योगदान देत आहेत. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना राष्ट्रीय स्तरावरील जीवन गौरव पुरस्कार देत आहोत. यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर योगदान देणाऱ्या ११ दिग्गज व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा हा १२ वा पुरस्कार वितरण समारंभ आहे, अशी माहिती नगरच्या आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी दिली.


पुरस्कार वितरण समारंभा बद्दल अधिक माहिती देताना समारंभाचे स्वागताध्यक्ष अॅड.के.डी.धुमाळ यांनी सांगितले, अमृतवाहिनी प्रवरा मातेचे सुपुत्र व संतकवी राष्ट्रप्रबोधक स्वामी गोविंदगिरी महाराज यांना राज्यातील महान संत मंडळांच्या शुभहस्ते हा 'जीवन गौरव पुरस्कार' देण्यात येणार आहे. देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज, प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर, नाशिकचे जगद्गुरु ज्ञानोबा-तुकोबा द्वाराचार्य व विद्यावाचस्पती ह.भ.प. डॉ. रामकृष्णदास लहवितकर महाराज, श्रीरामपुरच्या सरला बेटचे महंत ह.भ.प. रामगिरी महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज व देहूच्या श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज, संत समर्थ रामदास स्वामींचे ११ वे वंशज व सज्जनगड श्री रामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष महंत भूषण स्वामी व वसई पालघर येथील बालयोगी श्री सदानंद महाराज आदी संत विभूतींच्या शुभहस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 


या समारंभास विशेष अतिथी म्हणून गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी उपस्थित राहणर आहेत. तसेच पुण्याच्या महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा.प्रकाश सोमण, मोरया प्रकाशाचे प्रमुख दिलीप महाजन आदी उपस्थित राहणार आहेत.

        या समारंभात आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे लिखित 'मना शपथ खरं सांगेन - साक्ष ७५' या मोरया प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ग्रंथाचे लोकार्पण उपस्थित सर्व संतवृंदाच्या हस्ते होणार आहे. या गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यास सुहृद, रसिक, भाविक, राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त सौ.उषा सहस्रबुद्धे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या