Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हयात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


अहमदनगर,दि.११:-

राज्यात व अहमदनगर जिल्हयामध्ये सद्यस्थितीमध्ये गोवंश व म्हैसवर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९  अन्वये अधिसुचित केलेल्या रोगांमध्ये लम्पी चर्मरोगाचा अनुसचित रोग म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. 


महाराष्ट्र शासनाच्या ८ सप्टेंबर,२०२२ च्या अधिसूचनेनुसार प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९  (२००९ चा २७ ) याची कलमे (६) (७) (११) (१२) व (१३) याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासनाने वरील अधिनियमान्वये अनुसूचित रोग असल्याचे घोषित केलेल्या लम्पी चर्मरोगाच्या बाबतीत नियंत्रित क्षेत्र म्हणून संपुर्ण महाराष्ट्र राज्य घोषीत केलेले आहे.

एका राज्यातून दुस-या राज्यात, एका जिल्हयातून दुस-या जिल्हयात बाधीत जनावरांची वाहतूक केल्यामुळे बाधीत जनावरांपासून निरोगी जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. लम्पी रोग हा विषाणुजन्य सांसर्गिक रोग असल्याने या रोगाचा प्रसार होवू नये म्हणून अहमदनगर जिल्हयात उपरोक्त अधिसूचनेनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी, अहमदनगर डॉ. राजेन्द्र ब. भोसले यांनी प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ व महाराष्ट्र अधिसूचना दिनांक  १७ जून,२०२२  अन्वये त्यांना प्राप्त अधिकारान्वये लम्पी स्कीन या अनुसुचित रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलन करण्यासाठी संपुर्ण अहमदनगर जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषीत केला आहे. 


त्यानुसार अहमदनगर जिल्हयात लम्पी चर्मरोगावर (एलएसडी) नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निर्मुलन करता येईल आणि गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची ज्या ठिकाणी ते पाळले अथवा ठेवले जातात, त्या ठिकाणापासुन नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हयात गोजातीय प्रजातीची बाधीत असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी गोजातीय प्रजातीच्या कोणत्याही बाधीत झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्याच्या निवा-यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्याचे शव, कातडी किंवा कोणताही भाग किंवा अशा प्राण्याचे उत्पादन किंवा असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात आली आहे. 


गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशीचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्याचे गट करुन किंवा त्यांना एकत्रित करुन कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आली आहे. वरील नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या वरील रोगाने  बाधीत झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यांस मनाई करण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी अहमदनगर जिल्हयातील पशुसंवर्धन विभाग, पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, कटक मंडळ, नगरपरिषद/नगरपंचायत, ग्रामपंचायत), उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, अहमदनगर/श्रीरामपूर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व अनुषंगिक प्रशासकिय विभागांनी काटेकोरपणे करावी असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या