Ticker

6/Breaking/ticker-posts

बंदुक आणि पिस्तूल.. म्हणजे 'माकडा हाती कोलीत ..!' राज्यात नियमावली कठोर हवी ! - तांबे यांचं पोलीस महासंचालकांना खरमरीत पत्र - निष्काळजीपणे गोळी सुटण्याच्या घटनांत वाढ

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

     
अहमदनगर :- बंदूक आणि पिस्तूल म्हणजे माकडा हाती आयते कोलीत दिल्या सारखी स्थिती असून, बंदुक किंवा कायदेशीर परवाना असलेलं शस्त्र वापरताना निष्काळजीपणे त्यातून गोळी सुटल्याने मृ्त्यू झाल्याच्या घटना थांबवण्यासाठी याबाबत कठोर नियमावली अमलात आणावी, अशी मागणी काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे केली आहे.

  पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की,  नगर जिल्ह्यातच अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या आहेत. राज्यात अशयाच असंख्य घटना सतत्याने घडत आहेत. जुलै महिन्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे जिल्हा बँक शाखेच्या आवारात एका साखर कारखान्याच्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अनावधानाने सुटलेल्या गोळीमुळे एका ४२ वर्षीय व्यक्तीचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतरही जिल्ह्यात अशीच एक घटना घडली. सुरक्षा रक्षकाकडून बंदुकीचा चाप कसा ओढला गेला, गोळी कशी सुटली, याबाबत काहीच माहिती मिळाली नाही. मात्र त्यामुळे शस्त्रास्त्रे बाळगण्याचा परवाना असलेल्यांना ती कशी हाताळावी याची माहिती असे का, त्या शस्त्रांची निगा राखली जाते का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.

राज्यातील अनेक बँका, एटीएम सेंटर, रुग्णालये, मॉल, कंपन्या, शिक्षणसंस्था, कार्यालये, अशा सार्वजनिक ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात असतात. काही धनिक मंडळीही सोबत खासगी सुरक्षारक्षक ठेवतात. यातील काहींकडे शस्त्रदेखील असते. अशा सुरक्षा रक्षकांचं ऑडिट होणं, त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांची, ती चालवण्याचं ज्ञान संबंधित व्यक्तीकडे आहे का, अशा गोष्टींची तपासणी होणं गरजेचं आहे, असं सत्यजीत तांबे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

तांबे यांच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे सुरक्षा रक्षक म्हणून अनेकदा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नेमलं जातं. त्यांनी अनेक वर्षे शस्त्रं वापरली नसतात. अशा कर्माचाऱ्यांच्या हातात अचानक बंदुक देऊन सुरक्षेची जबाबदारी सोपवली जाते. शस्त्र नियम-२०१६ नुसार शस्त्रास्त्रे चालवण्याचं ज्ञान असलेल्यांनाच ती बाळगण्याची परवानगी दिली जाते. असं असताना अशा दुर्घटना घडत असतील, तर परवाना असूनही शस्त्र बाळगण्यासाठीचं पुरेसं ज्ञान आणि सराव नसणे किंवा अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचा सुळसुळाट ही दोन कारणे असू शकतात, याकडेही सत्यजीत तांबे यांनी लक्ष वेधलं. तसेच शस्त्रनियम - २१०६ यातील हे नियम अधिक कठोर करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केलं.

या पत्राद्वारे तांबे यांनी शस्त्रास्त्र नियमांबद्दल काही सूचनाही पोलीस महासंचालकांना केल्या आहेत. त्यानुसार सशस्त्र सुरक्षा रक्षक नेमताना त्याला ते शस्त्र चालवण्याचं आणि देखभाल दुरुस्तीचं ज्ञान असणं बंधनकारक करणं, शस्त्र हाताळण्याचा तीन ते सहा महिन्यांपेक्षा जुना नसलेला दाखला असणं, शस्त्र धारकाने ठरावीक काळाने त्या शस्त्राच्या परिस्थितीबद्दल माहिती सादर करणं, अवैध शस्त्र खरेदी-विक्रीला आळा घालणं, उचित कारणाशिवाय कोणत्याही प्रकारच्या शस्त्रांचे व्यासपीठावरील प्रदर्शन हा गुन्हा ठरवणं, आदी महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख आहे.

 त्याशिवाय एखाद्या आस्थापनेची किंवा व्यक्तीची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्यांना खासगी सशस्त्र सुरक्षारक्षक ठेवण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी सूचनाही तांबे यांनी केली आहे. तसंच अवैध शस्त्र खरेदी आणि विक्रीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणीही तांबे यांनी या पत्राद्वारे केली.

या उपाययोजनांची शक्यता पडताळून तसेच पोलीस खाते किंवा या संदर्भातील तज्ज्ञ व्यक्तींकडून याबद्दल अभिप्राय मागवून या सूचना त्वरीत लागू कराव्या, अशी विनंती सत्यजीत तांबे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या