अधिकाऱ्यांची अनुपस्थिती ; २७ जूनला आत्मक्लेश आंदोलन
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : सार्वजनिक बांधकाम खात्याने भगूर - वरुर रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी ६५ लाख रुपये तर, जिल्हा परिषदेने १५ लाख रुपये खर्च केले आहेत. मात्र, दोन्ही कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने कामाचे इस्टिमेट मिळावे, या मागणीसाठी दोन्ही विभाग टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ वरुर ग्रामस्थांनी सोमवारी (दिं.२० रोजी) सकाळी १० वाजता शेवगाव- नगर रस्त्यावर भगूर येथे दोन तास ' रास्ता रोको ' आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, आंदोलनस्थळी दोन्ही खात्याचे जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलनकर्ते आणखी आक्रमक झाले. त्यामुळे त्यांनी येत्या २७ तारखेला आत्मक्लेश आंदोलन करण्याचा गर्भित इशारा दिला आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आमदार मोनिका राजळे व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.राजश्री घुले पाटील यांनी भगूर - वरूर रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी अनुक्रमे ६५ व १५ लाख रुपये असा एकूण ८०लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, खर्चाच्या तुलनेत रस्त्याच्या कामाचा दर्जा नाही तसेच संगनमताने या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते या दोन्ही कामांचे इस्टिमेट मिळावे, या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. तथापि, दोन्ही विभाग एस्टिमेट देण्यास टाळाटाळ करीत असल्याने ग्रामस्थांनी भगूर येथे ' रास्ता रोको ' आंदोलन केले. त्यामुळे शेवगाव - नगर रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली.
आंदोलनाचे नेतृत्व गणेश मोरे, ज्ञानेश्वर खांबट, माणिकराव म्हस्के, मनोहर कर्डिले, बनेखा पठाण, सुरेश वावरे, देविदास वावरे, बंडू घायतडक, आत्माराम म्हस्के, मुकुंद लव्हाट, प्रवीण म्हस्के, बन्सी चितळे, सचिन म्हस्के, पिनू झिरपे, काकासाहेब पवार, भगवान लव्हाट, सुनील म्हस्के, अशोक वावरे, खंडू चितळे, अप्पासाहेब भुजबळ, भारत म्हस्के, भालू झिरपे आदींनी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा व गुप्तवार्ता शाखेचे अंमलदार बप्पासाहेब धाकतोडे यांनी आंदोलकांशी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
0 टिप्पण्या