Ticker

6/Breaking/ticker-posts

आमदार लंकेंच्या घरी शरद पवारांचा पाहुणचार ; मंत्री धनंजय मुंडे-आ.रोहित पवारांनीही दिली भेट

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर: जिल्ह्यातील महामार्गांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज थेट पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या घरी जाऊन त्यांचा पाहुणचार घेतला. पवार यानी लंके यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन तिथं जमलेल्या कार्यकर्त्यांचीही विचारपूस केली. पारनेर दौऱ्यावर असलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे देखील शरद पवार यांच्या पाठोपाठ लंके यांच्या घरी पोहोचले. त्यामुळे लंके यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. या भेटीमुळं नीलेश लंके यांचं राजकीय वजन आणखी वाढल्याची चर्चा आहे.

 विजय औटी यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करून नीलेश लंके यांनी पारनेर मतदारसंघ ताब्यात घेतला आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखे राहणारे व आमदारकीचा कुठलाही बडेजाव न मिरवणारे आपल्या मतदारसंघासोबतच नगर जिल्ह्यातही लोकप्रिय ठरले आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच शिवसेनेचे नगरसेवक फोडणारे लंके पहिल्यांदा राज्यात चर्चेत आले होते. वरिष्ठ नेत्यांमधील तडजोडीनंतर लंके यांनी फोडलेले नगरसेवक पुन्हा स्वगृही परतले. मात्र, लंके यांची बरीच चर्चा झाली. करोना संकटाच्या काळात लंके यांनी केलेलं काम राज्यभर आणि देशभर गाजलं. शरद पवार यांच्या नावानं त्यांनी कोविड रुग्णलाय देखील सुरू केलं होतं. अण्णा हजारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या कामाचं कौतुकही केलं.

त्यांच्या याच कामाची पोचपावती आज त्यांना मिळाली. शरद पवार हे स्वत: लंके यांच्या घरी गेले. लंके यांच्या दोन खोल्याच्या घरात त्यावेळी बरीच गर्दी झाली होती. लंके यांचे वडील ज्ञानदेव लंके गुरुजी व आई शंकुतला यांनी पवारांचं स्वागत केलं. लंके यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांची पवारांशी भेट घालून दिली. पारनेर दौऱ्यावर असलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे देखील शरद पवार यांच्या पाठोपाठ लंके यांच्या घरी पोहोचले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या