Ticker

6/Breaking/ticker-posts

नाव न घेता माजी मंत्री राम शिंदे यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर शरसंधान..

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर: 'परळीत आलेल्या करुणा शर्मा यांच्याबाबतीत जे काही घडले, त्यावरून त्यांच्याविरूद्ध कटकारस्थान रचल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारे जर राज्यातील एखाद्या मंत्र्याकडूनच कोणावर अन्याय करण्याची भूमिका दिसून येत असेल तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रसारमाध्यमांतून घटनेच्यावेळचे जे व्हिडिओ समोर आले आहेत, त्यावरून हे मोठे कारस्थान असल्याचे दिसते,’ असा आरोप भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला.

प्रा. शिंदे यांनी अहमदनगरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना हा आरोप केला. ते म्हणाले, ‘भारतात सर्वांना स्वातंत्र्य आहे. स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, काल परळी वैजनाथमध्ये जी घटना घडली, जे चित्र तेथे पहायला मिळाले, ते गैर आहे. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे सत्य आहे, ते समोर आणले पाहिजे. कोणाला अडवून दडवून काही साध्य करता येणार नाही. राज्यातील एखादा मंत्रीच जर अशी अन्याय अत्याचाराची भूमिका घेत असेल तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे.'

' शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल सापडणे हा सुद्धा एक कटच आहे. एवढा मोठा जमाव असताना, चालू गाडीत एक जण डिक्की उघडत आहे, हातातील वस्तू ठेवली जाते. दुसरा या बाजूचा माणूस डिक्की बंद करतो. त्याच्यासाठी शेजारी पोलिस उभा राहिलेला असतो. या सर्व गोष्टी पाहिल्या तर हा मोठा कट असल्याचे दिसून येते आहे. हे कायद्याचे राज्य आहे. यामध्ये सर्व प्रक्रिया त्याच मार्गाने झाल्या पाहिजेत. कोणावरही अन्याय होता कामा नये. मंत्र्यांनी जी शपथ घेतली आहे, ती स्मरणात ठेवून न्याय झाला पाहिजे,’ असेही शिंदे म्हणाले.

जावेद अख्तर यांच्यावर टीकास्त्र

जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना केल्याच्या विषयावर बोलताना प्रा. शिंदे म्हणाले, ‘जावेद अख्तरसारखी माणसे भारतात राहून इतर देशांबद्दल बोलत असतील तर त्यांचा जाहीर निषेध केला पाहिजे. हा भारत देश आहे. दीडशे वर्षे राज्य केलेल्या इंग्रजांना घालवून येथे लोकशाही आणलेली आहे. त्यामुळे येथे कोणी इतर देशांचे दाखले देऊ नयेत. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांसंबंधी न बोललेलेच बरे,’ असेही शिंदे म्हणाले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या