Ticker

6/Breaking/ticker-posts

..तर आमचाही नाइलाज होईल; जयंत पाटलांचा काँग्रेस व शिवसेनेला थेट इशारा

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर: ‘स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग किती सदस्यांचे असावेत, या मुद्द्यावर महाविकास आघाडीतील पक्षांनी वेगवेगळी मतं मांडली. त्यावर चर्चा होऊन सरकारचा निर्णय झाला. आम्ही सर्वजण या सरकारचे घटक असल्यानं तो निर्णय होण्यातही आमचाही वाटा आहेच. त्यामुळं आता ठरलेली प्रभाग रचना सर्वांनाच बंधनकारक ठरते,’ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  यांनी मांडली. जयंत पाटील नगरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंबंधी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांनी ही भूमिका मांडली.


प्रभाग रचनेबद्दल सरकारचा निर्णय झाल्यानंतरही काँग्रेसकडून आपली मागणी पुढं रेटली जात असल्याबद्दल विचारलं असता पाटील म्हणाले, ‘प्रभाग रचना बदलण्यासंबंधी जेव्हा चर्चा सुरू होती, त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण चार सदस्यांचा प्रभाग हवा अशी भूमिका मांडत होते. तर काँग्रेसची दोन सदस्यांची मागणी होती. राष्ट्रवादी काँग्रेसचेही मत दोन सदस्यीय रचना असावी असं होतं. मात्र, त्यावर चर्चा होऊन नंतर तोडगा काढण्यात आला. मंत्रिमंडळानं यासंबंधी निर्णय घेतला. त्यामुळं तो सर्वांनाच बंधनकारक ठरतो. या निर्णयाचे आम्ही सर्वजणच धनी आहोत. त्यामुळं आता यावर वेगळी चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यासोबतच हा निर्णय झाला म्हणून महाविकास आघाडीतील कोणाला दोषही देता येणार नाही,’ असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत राजकीय भूमिका काय आहे, याबद्दल सांगताना पाटील म्हणाले, ‘निवडणुका अद्याप दूर आहेत. त्यामुळं आघाडी म्हणून नेमकी भूमिका अद्याप ठरलेली नाही. मात्र, निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. आपापल्या पक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून नेते आपली मतं व्यक्त करीत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी अनेकदा नेत्यांना बोलावं लागतं. मात्र, हे काही अंतिम ठरू शकत नाही. आमची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आघाडी होण्यास प्राधान्य देण्याची भूमिका आहे. तसा आमचा प्रयत्नही राहील. मात्र, इतरांकडून वेगळा अग्रह सुरूच राहिला, तर आमचाही नाइलाज होईल. त्यानंतर सुद्धा आम्ही स्थानिक पातळीवर आघाड्यांचे योग्य ते निर्णय घेऊ. असे निर्णय तेथील परिस्थितीवर अवलंबून असतील. मात्र, ते करतानाही महाविकास आघाडीच्या मूळ संकल्पनेला धरूनच होतील, असं पाहिलं जाईल. महाविकास आघाडी कायम राहावी, अशीच आमची भूमिका आहे,’ असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या