Ticker

6/Breaking/ticker-posts

‘तर.. अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात जाईल’; व्वा रे बेट्या, तुला हे कुणी सांगितलं ?

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पारनेर: महाविकास आघाडीचे अनेक नेते सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यात भाजप नेते किरीट सोमय्या हे रोज उठून सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी किरीट सोमय्या आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. ईडीच्या नोटिसांवरून पाटील यांनी या दोन्ही भाजप नेत्यांना सवालही केला आहे.


पाटील यांनी तीरकस शब्दांत सोमय्या यांची खिल्ली उडवली. 'किरीट सोमय्या म्हणतात महाराष्ट्रातील अर्धे मंत्रिमंडळ  हॉस्पिटलमध्ये तर अर्धे तुरुंगात जाईल. व्वा रे बेट्या तुला हे कुणी सांगितलं?', असा सवालच पाटील यांनी केला. ईडीची नोटीस येण्याआधी किरीट सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांना कसं कळतं?, असा सवालही पाटील यांनी विचारला. पारनेर येथील मेळाव्यात पाटील बोलत होते.


महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचलं जात आहे. मंत्र्यांचं नावं घ्या नाहीतर तुमच्यावर कारवाई करू, असे सांगून खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. भाजप चुकीची संस्कृती महाराष्ट्रात आणू पाहत आहे. ही गोष्ट आपल्याला थांबवायची आहे, असे आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी केले. केंद्रीय संस्थांचा वापर करून गुंडगिरी सुरू आहे. सूडाचे राजकारण राज्यात नव्हे तर देशातही कधी झालेले नाही, मात्र भाजपकडून ऐनकेन प्रकारे असे राजकारण सुरू आहे असा आरोप पाटील यांनी केला.

मोदींनी लोकांना महागाईची सवय लावली !

पूर्वी चार आणे वाढले तरी आंदोलन व्हायचे. मात्र आता महागाई बेसुमार वाढूनही यावर कोणी आंदोलन करत नाही. पंतप्रधान मोदी यांनी लोकांना महागाईची एकप्रकारे सवयच लावली आहे. पक्षाच्या माध्यमातून हे विषय लक्षात आणून देण्यासाठी आंदोलन उभे केले पाहिजे, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली. मागील काही दिवसांपासून राज्यभरात संततधार सुरू आहे. धरणे तुडुंब भरली आहेत. पिकांचे नुकसान झाले आहे. अशावेळी शेतकरीच उरला नाही तर पाणी मिळून फायदा काय? म्हणून या अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे पूर्ण करत, पडेल ती किंमत देऊ पण शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असे पाटील यांनी स्पष्ट केले. आमदार नीलेश लंके यांनी करोना काळात न भूतो न भविष्यती असे काम केले आहे. लोकसंपर्क असलेला नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्यामुळे आज तरुण पिढीचा पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, असे गौरवोद्गार पाटील यांनी काढले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या