Ticker

6/Breaking/ticker-posts

‘असल्या’ आरोपांना भीक घालीत नाही, अदखलपात्र..! - आ. संग्राम जगताप

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नगर: आयटीपार्कमध्ये जाऊन गोंधळ करणारे उठसूट माझ्यावर आरोप करत असतात, त्याकडे कधी ढुंकूनही पाहिले नाही. मात्र आयटी पार्क संदर्भात करण्यात आलेले आरोप नगरच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे यात लक्ष घालत आहे. त्यांच्याशी एका व्यासपीठावर चर्चा करायला ते अदखलपात्र असून आमचे कार्यकर्तेच समर्थ आहेत, असल्या आरोपाना भीक घालत नाही, असा गर्भित इशारा शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी दिला.

राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेत एकत्र असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अहमदनगर शहरातील वितुष्ट वाढत चालले आहे. आता तो वाद आणखी विकोपाला गेला आहे. येथील आयटी पार्कच्या निमित्ताने काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप  यांच्यातील वादाला जाहीर तोंड फुटले. जगताप यांना उघडे पाडण्याचा प्रयत्न करण्यासाठी काळे यांनी आयटी पार्कला भेट दिली. मात्र, त्यानंतर त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. नंतर दोघांनी पत्रकार परिषदा घेऊन आरोप –प्रत्यारोप करीत परस्पाराना आव्हान दिले आहे.

आमदार जगताप यांनीही त्यानंतर पत्रकार परिषद घेत काळेंच्या आरोपांचा समाचार घेतला. त्यांनी सांगितले की, ‘आयटी पार्कची इमारत गेले एकोणीस वर्षे धुळखात पडून होती. तेथे उद्योग आणण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. अखेर एमआयडीसीने त्यावरील आयटी पार्कचा दर्जा रद्द करत इतर प्रकारच्या उद्योगांना तेथे भाडेतत्वावर जागा दिल्या. मात्र, आयटी पार्क सुरू करण्यासाठी मी २०१६ पासून प्रयत्न करीत होतो. त्यासाठी पुणे, मुम्बई, बेंगलोर येथील उद्योजकाना भेटून त्यानी नगरमध्ये त्यांचे व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांचे मन वळविले. खासगी खर्चातून दुरूस्ती केली. स्टार्टअप सुरू करण्यास कंपन्यांना निमंत्रण दिले. आम्ही नगरच्या तरुणाईला काम मिळावे म्हणून प्रयत्न केले तर त्याचा त्रास आता काहींना होत आहे. आयटी पार्कची इमारत म्हणजे राजकीय व्यासपीठ किंवा पक्ष कार्यालय नाही. बदनामी करून सुरू असलेले काम बंद पाडण्याचे कारस्थान आहे. त्यापेक्षा आपले कर्तृत्त्व दाखवून चांगले व लोकोपयोगी कामे करावीत,’ असे प्रतिआव्हान आ.जगताप यांनी काळे यांचे नाव न घेता दिले.

जगताप यांनी निवडणूक प्रचारात आयटी पार्क मध्ये कंपन्या आणू आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते. ते खोटे असल्याचे दाखवून देण्यासाठी काळे यांनी गुरुवारी तेथे जाऊन पाहणी केली. मात्र, त्यानंतर त्यांना गुन्ह्याला सामोरे जावे लागले. यासंबंधी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत आयटी पार्कमधील पाहणीचे चित्रिकरणच त्यांनी पत्रकारांना दाखवित राष्ट्रवादीसह जगताप यांच्यावर आरोप केले होते. त्याला आ. जगताप यानी प्रतिउत्तर दिले असून  काँग्रेस- राष्ट्रवादीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या