Ticker

6/Breaking/ticker-posts

'सध्याच्या सरकारने पंडित नेहरूंचे आजन्म ऋणी राहायला हवे, पण...'

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबईः 'नेहरुंनी निर्माण केलेली राष्ट्रीय संपत्ती विकून सरकार मजा मारीत आहे. नेहरूंनी राष्ट्रीय संपत्ती निर्माण केली नसती तर देशात बेरोजगारी, उपासमारीचे अराजक माजले असते. नेहरूंच्या दूरदृष्टीपणामुळं हे संकट टळले. या बद्दल सध्याच्या सरकारने पंडित नेहरूंचे आजन्म ऋणी राहायला हवे, पण याउलट देशाच्या स्वातंत्र्य समरातून नेहरूंचे नावच गायब केले गेले,' अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून भाजप सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ' हिंदुस्थानी स्वातंत्र्याचे सध्या ७५ वे म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. हिंदुस्थानात इतिहास संशोधनावर काम करणाऱ्या 'इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च' (ICHR) या संस्थेने 'आजादी का अमृत महोत्सव'च्या पोस्टरवरून पंडित नेहरूंचे चित्र वगळले. या पोस्टरवर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, मदन मोहन मालवीय आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची छायाचित्रे ठळकपणे आहेत, पण पंडित जवाहरलाल नेहरू व मौलाना अबुल कलाम आझाद यांना वगळण्यात आले. नेहरू, आझादांना वगळून स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, पण नेहरूंना खासकरून वगळून विद्यमान सरकारने आपल्या कोत्या मनाचे दर्शन घडविले,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

'ज्यांचा इतिहास घडविण्यात सहभाग नव्हता व देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून जे दूर राहिले अशांकडून स्वातंत्र्य लढ्याचे एक नायक पंडित नेहरूंनाच स्वातंत्र्य लढ्यातून दूर केले जात आहे. हे बरे नाही. पंडित नेहरू व त्यांच्या काँग्रेस पक्षाविषयी मतभेद असू शकतात. नेहरूंच्या राष्ट्रीय, राजकीय, आंतरराष्ट्रीय भूमिका कदाचित कुणाला मान्य नसतील, पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील नेहरूंचे स्थान राजकीय द्वेषापायी पुसून टाकणे हा स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक सैनिकाचा अपमान आहे,' असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं आहे.

' विद्यमान मोदी सरकारचे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधींशी राजकीय भांडण असायला हरकत नाही. सरकारने राजीव गांधी यांच्या नावाने दिल्या जाणाऱया खेलरत्नपुरस्काराचे नावही बदलून आपला द्वेष जगजाहीर केला, पण पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांचे स्वातंत्र्य लढय़ातील आणि देशाच्या जडणघडणीतील योगदान हा अमर इतिहास आहे. तो नष्ट करून काय साध्य होणार?,' असा सवाल राऊतांनी केला आहे.

' राहुल गांधी, प्रियंका, सोनियांशी मोदी सरकार, भारतीय जनता पक्षाचे भांडण असू शकेल, पण पंडित नेहरुंशी वैर का? नेहरूंनी निर्माण केलेली राष्ट्रीय संपत्ती विकूनच आज सरकार अर्थचक्राला गती देत आहे. स्वातंत्र्य लढ्यातील नेहरूंचे स्थान अढळ आहे. तो इतिहास पुसणे हे शौर्य नाही,' असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या