Ticker

6/Breaking/ticker-posts

'त्या' तक्रारीत तथ्य नाही ! पारनेरच्या तहसीलदार देवरे यांची अखेर बदली ;आज पुन्हा लाचलुचपतकडे होणार एक तक्रार दाखल..?

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर : लोकप्रतिनिधींकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार करून आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर जळगावला बदली करण्यात आली. देवरे यांनी महिला आयोग आणि नाशिकच्या महसूल आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून येत नसल्याचा अहवाल समितीने दिला. तर दुसरीकडे देवरे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारींत तथ्य आढळून आल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचा आदेश आज काढण्यात आला. त्यांना १४ सप्टेंबरपासून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत असून तातडीने नव्या ठिकाणी पदभार स्वीकारण्याचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान ज्योती देवरे यांच्याविरूद्ध अड. असीव सरोदे हे लाच लुचपत विभाकडे आज आणखी एक तक्रार दाखल करणार असल्याची माहिती हाती आली आहे, त्यामुळे राहुल झावरे विरुद्ध देवरे प्रकरण पुन्हा एकदा कोणते वळण घेणार याबाबत उत्सूकता निर्माण झाली आहे.


गेल्या महिन्यात पारनेर तालुक्यात हे प्रकरण गाजले होते. देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा उल्लेख त्यामध्ये होता. यावरून राज्यभर चर्चा झाली. या प्रकाराला पुढे राजकीय स्वरूपही मिळाले. महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचा आदेश देण्यात आला. त्यासाठी महिला अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली. तर दुसरीकडे देवरे यांच्याविरुद्ध काही ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींचीही चौकशी झाली. देवरे यांच्याविरुद्धच्या चौकशीचा अहवाल पूर्वीच आला आहे. त्यामध्ये देवरे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा, पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर महिला आयोगाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या चौकशीचा अहवालही आता प्राप्त झाला असून देवरे यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून येत नसल्याचे त्यात म्हटले आहे.

सरकारचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी सरकारच्या वतीने देवरे यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. देवरे यांची पारनेरहून जळगाव जिल्ह्यात अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आलेले नाही. मात्र, त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने त्यांची बदली करण्यात येत आहे. हा आदेशच त्यांचा कार्यमुक्ती आदेश समजावा, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या जागी पारनेरला अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.

देवरे प्रकरणावरून राज्यात राजकारणही पेटले होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी देवरे यांची बाजू लावून धरली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार लंके यांना अडचणीत पकडण्याचाही यावरून प्रयत्न झाला होता. मात्र, आता सरकारने देवरे यांची बदली केल्यामुळे विरोधकांची भूमिका काय असेल, हे लवकरच कळेल. तर दुसरीकडे देवरे यांनी स्थानिक चौकशी समितीला विरोध दर्शवत राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्याची मागणी केली होती. त्यामुळे त्यांचीही पुढील भूमिका काय असेल याकडे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या