Ticker

6/Breaking/ticker-posts

'त्या' नराधमांना जबर वचक बसवा !; मुख्यमंत्री ठाकरे यांचा इशारा

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, त्यासाठी पूर्ण पाठबळ देण्यात येईल. यातून महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना जबर वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करा, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करतीलच, पण निराधार, असहाय महिलांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धोरण म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने संयुक्तपणे प्रयत्न करावे लागतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात सगळे उत्सव, कार्यक्रम सहजपणे, उत्साहात साजरे होऊ शकतात. हे केवळ पोलीस सदैव दक्ष असतात म्हणूनच. जनतेची काळजी घेणारे महाराष्ट्राचे रक्षक अशी त्यांची प्रतिमा आहे. त्याला साजेसे ते कामही करताहेत. पण दुर्दैवी घटना घडते आणि सगळेच हादरून जातात. त्यावेळी काय करावे याची चर्चा सुरू होते. अशा घटनांची माहिती घेतली तर सून्न व्हायला होते आणि जनजागृती, लोकशिक्षण करायचे, तर कोणत्या वयापासून आणि केवळ राज्यातल्यांचे की इतर राज्यातून येणाऱ्यांचे असा प्रश्न उभा राहतो. कोविडच्या संकटातून बाहेर पडताना, आपल्याला अर्थचक्रही सुरू ठेवायचे आहे. पण पोस्ट कोविड परिणाम किती भयंकर असू शकतात हे दिसू लागले आहे. वैफल्यग्रस्तता वाढते आहे, त्याचे आव्हानही आपल्यापुढे आहे. त्यामुळे आता अशा दुर्दैवी घटनांबाबत प्रतिक्रिया देतानाही सजगता बाळगायला हवी. या प्रतिक्रियांतून आपण काय साधतो आणि आहे ते वातावरण तर बिघडवत नाही, याचा विचार करायला हवा, चुकीचे चित्र रंगवले जाऊ नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील महिलांच्या तसेच बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने गृह विभागाची आढावा बैठक झाली. त्यात मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे निर्देश दिले. पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या या बैठकीस गृहमंत्री वळसे पाटील यांच्यासह राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांच्यासह वरीष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील विविध पोलिस आयुक्तालयांचे वरीष्ठ अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

 मुख्यमंत्री ठाकरे यांचे निर्देश...


*गुन्ह्यात रिक्षांचा वापर झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. त्यावर रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालण्यात यावा. त्याबाबत नोंदणी करतानाच स्थानिक पोलिसांकडे माहिती देण्याचे संबंधित परवानाधारकाला बंधनकारक करावे.

* इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल.
* जलदगती न्यायालयांतून निकाल लागतो पण शिक्षेच्या अमंलबजावणीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणा करण्याचे प्रयत्न व्हावेत.
*निती आयोगाच्या उद्या (मंगळवारी) होणाऱ्या बैठकीत जलदगती न्यायालयांच्या कार्यप्रणालीत धोरणात्मक सुधारणा करण्याची सूचना करण्यात यावी.
*शक्ती कायद्यातही या अनुषंगाने सुधारणा करण्यावर भर दिला जाईल.
*महिला पोलिसांनी पीडित महिलांशी संवाद साधून, विश्वासाने बोलून माहिती घ्यावी. त्यांच्या छोट्या तक्रारींकडेही दुर्लक्ष होऊ नये.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या