Ticker

6/Breaking/ticker-posts

एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार; राज्य सरकारनं झटपट घेतला 'हा' निर्णय

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: थकीत वेतनामुळं आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं अखेर दिलासा दिला आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी तातडीनं देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर तातडीनं हा निधी महामंडळाला वितरीत करण्यात आला आहे.

चालू आर्थिक वर्षासाठी १४५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी ८३८ कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरीत करण्यात आला आहे. उर्वरीत ६१२ कोटींपैकी ५०० कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानंतर तातडीने हा निधी वितरीत करण्यात आला. निधी वितरीत झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे.

पगार वेळेवर होत नसल्यानं आलेल्या नैराश्यातून मागील महिन्यात धुळे जिल्ह्यातील साक्री इथं एका एसटी चालकानं आत्महत्या केली होती. माझ्या आत्महत्येसाठी एसटी महामंडळाला जबाबदार धरावं, असं त्यानं चिठ्ठीत नमूद केलं होतं. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. कर्मचाऱ्यांनी आगार बंद करून महामंडळाचा निषेध केला होता. विरोधी पक्षांनीही राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. सर्व बाजूंनी दबाव आल्यानंतर सरकारनं तातडीनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या