Ticker

6/Breaking/ticker-posts

शिक्षक म्हणजे लौकिकार्थाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्ग दाखवणारे गुरू

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नगर: शिक्षक दिनानिमित्त अनेकांनी सोशल मीडियातून शिक्षकांना शुभेच्छा देत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या शिक्षकांबद्दल लिहिताना या क्षेत्राविषयाची मतंही व्यक्त केली आहेत. सोशल मीडियातून नेहमी व्यक्त होणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही या विषयावरील आपली मंत मांडली आहेत. लौकिकार्थाने शिक्षक म्हणजे फक्त शाळा-कॉलेजात विद्यार्थ्यांना शिकवणारे नाही तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्ग दाखवणारे हे गुरु असतात असे सांगत त्यांनी आई-वडिलांनी आपल्याला खऱ्या अर्थाने घडविल्याचे सांगत विरोधकांकडूनही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचे म्हटलं आहे.

शिक्षकांबद्दल पवार यांनी म्हटलं आहे, ‘अंधारातही दृष्टी देणारे, अडचणीत मार्ग दाखवणारे, कधीही निवृत्त न होणारे आणि सुसंस्कृत समाज घडवणारे शिल्पकार कोण असतील तर ते शिक्षक. शीलवान, क्षमाशील, कर्तव्यनिष्ठ असंही शिक्षकांविषयी सांगितलं जातं. लौकिकार्थाने शिक्षक म्हणजे फक्त शाळा-कॉलेजात विद्यार्थ्यांना शिकवणारे नाही तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्ग दाखवणारे हे शिक्षक असतात. अशा असंख्य शिक्षकांनी मला घडवलंय. माझी आई (सौ. सुनंदाताई पवार) आणि बाबा (राजेंद्रदादा पवार) हे माझे पहिले शिक्षक. पहिलं पाऊल उचलायला शिकवल्यापासून नंतर मागे वळून न पाहता केवळ चालत रहायला आणि चालताना सर्वांना सोबत घ्यायलाही त्यांनीच मला शिकवलं. त्यामुळं आज मी जो काही आहे त्यात सर्वांत मोठा वाटा आई-बाबांचा आहे.

शाळा-कॉलेजमध्ये असताना मला लाभलेल्या सर्वच शिक्षकांनी मला घडवलं, योग्य वेळी कौतुक केलं आणि चूक झाली तेंव्हा कानही पकडले. पण व्यापक अर्थाने जेंव्हा मी विचार करतो तेंव्हा जीवनाचं मूल्य, सामाजिक जाण, नैतिकता, संयम, सत्य, कणव, दुसऱ्यासाठी वेळ देणं, त्यांच्या अडचणी सोडवणं या सर्व गोष्टी मला कळत नकळत समाजात भेटलेल्या असंख्य माणसांकडून उमगल्या, असे पवार म्हणाले.

विरोधकांकडूनही शिकायला मिळाले

राजकीय प्रांतात आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई आणि अजितदादा यांच्याकडून जे शिकायला मिळालं आणि मिळतं त्याची तुलना तर कशाहीही होऊ शकणार नाही. विरोधकांकडूनही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. व्यक्ती लहान असो की मोठी, पदावर असो की सामान्य माणूस असो. अशा प्रत्येकाकडून मला नेहमीच काही न काही शिकायला मिळतं. सार्वजनिक जीवनात भेटलेले पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आप्तेष्ट, मित्र, लहान मुलं, माझ्यावर प्रेम करणारी मंडळी, माझ्या मतदारसंघातील नागरीक एवढंच काय रस्ता चुकल्यावर मार्ग दाखवणारा रस्त्यातील प्रत्येक वाटसरू हे सर्वजण माझे शिक्षक आहेत.असे म्हणत या सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या