Ticker

6/Breaking/ticker-posts

‘या’ कारणामुळे काही जिल्ह्यांत कमी लसपुरवठा ?, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे स्पष्टीकरण

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


अहमदनगर :‘करोना रुग्णांचे प्रमाण जास्त असूनही अहमदनगरसह काही जिल्ह्यांत लशीचा पुरवठा कमी होत आहे. सुरवातीच्या काळात अनेक जिल्ह्यांत नागरिक लस घेण्यासाठी पुढे आले नाहीत. गैरसमज किंवा अन्य कारणांमुळे त्यावेळी लस शिल्लक राहण्याचे, मुदत संपल्याने वाया जाण्याचे प्रमाण जास्त होते. तेव्हापासून या जिल्ह्यांत लसींचा पुरवठा कमी करण्यात आला. तीच पद्धत अद्याप सुरू राहिली,’ असे कारण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले


राज्याने लसीकरणात विविध विक्रम केल्याचे सांगितले जात असले तरी अनेक जिल्ह्यांत लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. लोकांना लस मिळविण्यासाठी चकरा माराव्या लागत आहेत. अनेक ठिकाणी गोंधळ आणि गैरप्रकारही होत आहेत. आता निर्बंध शिथील करताना अनेक ठिकाणी लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे लस घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे करोना बाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे.

यासंबंधी पत्रकारांनी विचारले असता मुश्रीफ म्हणाले, हे खरे आहे की, ‘अनेक जिल्ह्यांत लस कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही आतापर्यंत अवघे २६ टक्के लसीकरण झाले आहे. रुग्ण संख्या आणि लोकसंख्या विचारात घेऊन लस पुरवठा व्हावा, यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करीत आहोत. मात्र, पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन लस पुरवठ्याचे प्रमाण ठरविण्यात आले आहे. ज्या भागात सुरवातीच्या दोन-तीन महिन्यांत लसीकरणाचे प्रमाण चांगले होते, तेथे आजही चांगला पुरवठा होत आहे.'

'मात्र, जेथे सुरवातीला लोकांचा गैरसमज अगर अन्य कारणांमुळे लसीकरण कमी झाले. तेथील कोटा कमी झाला. आता लोक तयार असले तरी जुन्याच पद्धतीने लशींचे वितरण होत आहे. अलीकडेच खासगी रुग्णालयांतही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी त्यांचाही अनुभव चांगला नाही. सरकारी केद्रांवर गर्दी होत असताना ज्यांना परवणार आहे, अशी मंडळीही खासगी रुग्णलयात जाऊन लस घेत नाहीत. त्यामुळे त्यांना पुरविण्यात आलेल्या लसीची मुदत संपून ती वाया जाण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नगरसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना आवाहन करीत आहोत, की त्यांनी अशी लस खरेदी करून आपल्या भागातील लोकांना देण्याची व्यवस्था करावी,’ असेही मुश्रीफ म्हणाले.

शिर्डीचे मला माहित नाही

शिर्डीच्या साईबाबा संस्थानवरील नवीन विश्वत मंडळ नियुक्ती रखडली आहे. त्यासंबंधी पालकमंत्री या नात्याने मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, ‘या विषयावर मला काही सांगता येणार नाही. त्यासंबंधी माझ्याकडे माहिती नाही. मात्र, पुढील वेळी येईल, तोपर्यंत उत्तर मिळालेले असेल,’ असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. विश्वस्त नियुक्तीसंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली असून त्यासाठी सरकारने मुदत वाढवून घेतलेली आहे. मागील वेळीही मुश्रीफ यांनी या विषयावर बोलणे टाळले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या