Ticker

6/Breaking/ticker-posts

'घंटानाद करा किंवा आणखी कुठलाही नाद करा, पण आमचा नाद करू नका'

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: राज्यातील मंदिरं उघडलीच पाहिजेत, अन्यथा घंटानाद आंदोलन करू, असा इशारा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईच्या महापौर किशोरी पेड्णेकर यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. ' घंटानाद करा किंवा आणखी कसला नाद करा, पण आमचा नाद करू नका,' असा थेट इशारा पेडणेकर यांनी मनसेला दिला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं दहीहंडी उत्सवावर घातलेले निर्बंध झुगारून आज मनसेनं मुंबई, ठाण्यात दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी काही नेते व कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारवर तोफ डागली. सण-उत्सवांमुळं करोना बरा पसरतो. यात्रा आणि मेळाव्यांनी पसरत नाही का,' असा सवाल राज यांनी केला होता. तसंच, मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्याला महापौर पेडणेकर यांनी उत्तर दिलं.


'काही लोकांना फक्त आपल्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत. पण हे करताना लोकांच्या भावनेचा विचार करतो असं ते दाखवतात. सध्याच्या संकटाच्या परिस्थितीत लोकांच्या जीवाचा विचार करायला हवा. राज्य सरकार तेच करतंय, असं पेडणेकर म्हणाल्या. ' करोनाचा संसर्ग वाढतो तेव्हा हेच सगळे लोक बिळात जाऊन लपतात, असा बोचरा टोलाही त्यांनी हाणला.

पहिल्या लाटेत रडणारे आता दहीहंडीसाठी चिथावणी देतायत!

करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी रुग्णांची अवस्था पाहून मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे भावुक झाले होते. रुग्णांच्या परिस्थितीचं वर्णन करताना त्यांना अश्रूही आवरले नव्हते. तो व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता. त्याकडं लक्ष वेधत महापौर पेडणेकर म्हणाल्या, 'तेव्हा हेच लोक रडत होते. आता हे दहीहंडीसाठी लोकांना गर्दी करण्याकरता चिथावणी देतायत. ह्यांचं कुठलं वागणं खरं? तेव्हाच की आताचं हेच समजत नाही. की ते केवळ मगरीचे अश्रू होते?,' असा खोचक सवालही त्यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या