Ticker

6/Breaking/ticker-posts

अण्णा हजारे इतके दिवस होते कुठे?; राज ठाकरेंचा खोचक सवाल

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: करोनाचे निर्बंध हळूहळू शिथील होत असल्यानं मंदिरं खुली केली जावीत, यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही विरोधकांच्या मागणीला पाठिंबा देत मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे. त्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारलं असता, 'अण्णा इतके दिवस होते कुठं?' असा थेट सवाल त्यांनी केला.


दहीहंडी उत्सवावरील निर्बंधांच्या विरोधात मनसेचे कार्यकर्ते आज मुंबई, ठाण्यात रस्त्यावर उतरले होते. निर्बंध झुगारून कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी दहीहंडी फोडली. तसंच, सरकारचा निषेधही केला. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केला. यात्रा, जत्रा, मेळावे बिनबोभाट होतात, मग सण-उत्सवांच्याच वेळी करोना कसा पसरतो? असा सवाल त्यांनी केला. राज्यातील मंदिरंही उघडली गेली पाहिजेत. अन्यथा, मनसे सर्व मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.


मंदिरं उघडण्याची मागणी करत भाजपनं कालच राज्यभर शंखनाद आंदोलन केलं. तत्पूर्वी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी अण्णा हजारे यांचीही भेट घेतली होती. अण्णा हजारे यांनी त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला होता. तसंच, आंदोलनात सहभागी होण्याचंही आश्वासन दिलं होतं. अण्णा प्रत्यक्ष आंदोलनात उतरले नसले तरी मंदिरं उघडायला हवीत ही त्यांची मागणी कायम आहे. समाजाला बिघडवणारी दारूची दुकानं सुरू आहेत आणि माणसं घडवणारी मंदिरं बंद आहेत, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली होती. अण्णांच्या याच भूमिकेबद्दल राज यांना आज विचारण्यात आलं होतं. त्यावर अण्णा इतके दिवस कुठं होते? असा सवाल त्यांनी केला. मागील काही वर्षांपासून अण्णा हजारेंनी एकही आंदोलन केलेलं नाही. त्यामुळं अण्णा शांत का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज यांनीही असाच प्रश्न केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या