Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगावला अतिवृष्टी , पुराचा वेढा; एनडीआरएफचे पथक दाखल

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर: शेवगाव तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीने नद्यांना पूर आला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने तब्बल बारा तासांपासून वाहतूक ठप्प असून अनेक गावांना पुराने वेढा दिला आहे. बचाव कार्यासाठी पुण्याहून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि औरंगाबाद महानगरपालिकाचे आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाले आहे. अनेकांची जनावरे आणि वाहने वाहून गेली असून आतापर्यंत एक जण बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली आहे. दुपारी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पुन्हा पावसाला सुरवात झाली आहे.

नगर जिल्ह्यात शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याला पावसाचा जास्त फटका बसला आहे. शेवगाव तालुक्यात आखेगाव, वडुले, वरुर, भगूर, खरडगाव या नदीकाठच्या गावात पुराचे पाणी घुसल्याने अनेकांचे अतोनात नुकसान झाले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट झाली. सुमारे दीडश जण पुराच्या पाण्यात अडकले होते. काहींची जनावरे, वाहने वाहून गेली. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वडुले येथील ज्येष्ठ नागरिक मुरलीधर आनंदराव सागाडे देव दर्शनासाठी गेले असता, ते बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरु आहे. पाणी वाढता पाहून अनेकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने घराच्या छतावर, झाडावर रात्र जागून काढली. नंदिनी व नानी नदी काठची शेती वाहून गेल्याने तेथील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सकाळपासून नेवासा येथील महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी मदतीसाठी धावून आले आहेत. आमदार मोनिका राजळे, सभापती क्षितिज घुले, माजी सभापती अरुण लांडे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार अर्चना पागिरे, गट विकास अधिकारी महेश डोके यांनी पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. राष्ट्रवादीच्या वतीने पूरग्रस्तांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली.

पहाटेपासूनच नद्यांना आलेल्या पुरामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. नद्यांच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सायंकाळी पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरू झाली. दरम्यान, दुपारी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पुन्हा पावसाला सुरवात झाली. जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाने दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या