Ticker

6/Breaking/ticker-posts

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रंथालये ऑनलाइन करावीत: उदय सामंत

 

*राज्य मध्यवर्ती ग्रंथालयातील पुस्तके ऑनलाइन उपलब्ध करायला हवीत

*यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई : राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात जवळपास १२ लाख पुस्तके आहेत. ही ग्रंथसंपदा जतन करण्याबरोबरच भावी पिढीला सहज उपलब्ध होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन जगभरातील विद्यार्थ्यांना ग्रंथालये ऑनलाइन उपलब्ध करुन द्यावे. यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.


उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्यावतीने राज्य मध्यावर्ती ग्रंथालय येथे आजादी का अमृत महोत्सवया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव इंद्रा मालो, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव प्रताप लुबाळ, ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, ग्रंथपाल संजय बनसोड, संबंधित अधिकारी, वाचक उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, इतिहासाची माहिती भावी पिढीला उपलब्ध व्हावी यासाठी ग्रंथालय सक्षम असली पाहिजेत. ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करुन तरुण पिढीला इतिहासाची माहिती उपलब्ध करुन द्यावी. त्याच बरोबर या ग्रंथालयामध्ये संशोधन केंद्रही सुरु करावे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) परीक्षेची तयारी करण्यासाठी शासनस्तरावर विविध माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ग्रंथालयांनी फिरते ग्रंथालयाच्या माध्यमातून ग्रंथसंपदा ग्रामपंचायत पातळीपर्यंत पोहोचवली पाहिजे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. शासकीय ग्रंथालयामध्ये ग्रंथ विक्रीसाठीही परवानगी देण्यात येणार आहे, असे ही मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.

सचिव इंद्रा मालो म्हणाल्या, भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असून यानिमित्त ग्रंथालय संचालनालयातर्फे 'आजादी का अमृत महोत्सव' हा महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उपक्रमात सर्वांनी सहभाग नोंदवावा.

जिल्हाधिकारी राजीव निवतकर म्हणाले, ‘करो या मरोही घोषणा देत महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाची सुरूवात केली. भारत छोडो चळवळीची ही इमारत साक्षीदार आहे. आपल्या देशातील स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या स्वातंत्र्य चळवळीचे आपल्या मनामध्ये असलेले प्रतिबिंब कायम राहावे म्हणून 'आजादी का अमृत महोत्सव' हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे.

ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले म्हणाल्या, देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण करत आहे. महात्मा गांधीनी केलेल्या दांडी यात्राया स्वातंत्र चळवळीतील आंदोलनाला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून साबरमती आश्रमापासून 'आजादी का अमृत महोत्सव' या महोत्सवाचा शुभारंभ झाला आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनाचे सांस्कृतिक मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय, राज्यातील शासकीय आणि शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून ९ ते १५ ऑगस्ट २०२१ या कालावधीत विविध कार्यक्रम व उपक्रम साजरे करण्यात येत आहेत. त्याचा आरंभ व उद्द्याटन सोहळा ९ ऑगस्ट या ऐतिहासिक क्रांती दिनी महाराष्ट्र राज्याचे शिखर ग्रंथालय असलेले राज्य मध्यावर्ती ग्रंथालयापासून होत आहे, अशी माहिती इंगोले यांनी दिली.

यावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकीय, भौगोलिक, इतिहास, विज्ञान भरारी, भारतातील कला, क्रीडा, व साहित्यामधील मानकरी, भारताचे राजकीय अस्तित्व, कृषीप्रधान भारत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, भारतीय आधुनिक स्त्री, उतुंग भरारी अशा विविध ग्रंथाचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाची मान्यवरांनी पाहणी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या