*तहसीलदार ज्योती देवरे यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट
*अण्णा
हजारे यांनी देवरे यांना दिला विशेष सल्ला
*ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर तहसीलदार देवरे यांनी
मांडली बाजू
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर : लोकप्रतिनिधींच्या जाचाला
कंटाळून आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पारनेरच्या
तहसीलदार ज्योती देवरे यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. ' खचून जाऊ नका, अपमान सहन करण्याची ताकद ठेवा. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे
यांचा आदर्श ठेवून बदलीला न घाबरता काम करा,' असा सल्ला
हजारे यांनी त्यांना दिला. त्यांच्याकडून राखीही स्वीकारली. पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनीही कालच अण्णा हजारे यांची या प्रकरणी भेट घेतली होती.
त्यामुळे देवरे आणि हजारे यांच्या भेटीबद्दलही उत्सुकता होती.
पारनेर तालुक्यासह राज्यात या प्रकरणाची चर्चा आहे.
शनिवारी आमदार लंके यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी देवरे
यांच्याविरुद्धचा चौकशी अहवाल हजारे यांना दिला. हजारे यांच्यासोबत त्यांची
चर्चाही झाली. पारनेर तालुक्याची बदनामी होत असेल तर याप्रकरणी आपण
मुख्यमंत्र्यांशी बोलू, असंही हजारे यांनी आमदार लंके यांना आश्वासन दिले. देवरे यांनी हजारे
यांची भेट घेण्याआधीच आमदार लंके यांनी भेटून आपली बाजू मांडल्याचं सांगण्यात आलं.
त्यानंतर आज सकाळीच देवरे यांनीही
अण्णा हजारेंची राळेगणसिद्धी येथे जाऊन भेट घेतली. त्यांच्यासोबतही हजारे यांनी
चर्चा केली. सुरुवातीला अण्णांनी देवरे यांना भेट नाकारल्याची चर्चा पसरली होती.
प्रत्यक्षात मात्र हजारे व देवरे यांची भेट झाली आहे.
यावेळी देवरे यांना अण्णा म्हणाले, या प्रकरणाची माहिती मिळाल्यापासून
नेमकं काय घडले आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही संपर्क
करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, संपर्क होत नव्हता.
खचून जाऊ नका, धीराने परिस्थितीला समोरे जा. अधिकारी
म्हणून लोकसेवेचे काम करताना अपमान पचवण्याची ताकद ठेवली पाहिजे. वरिष्ठ अधिकारी
तुकाराम मुंडे यांच्याकडे पाहा. त्यांच्या आजपर्यंत किती वेळा बदल्या झाल्या?
तरीही ते डगमगत नाहीत. आत्महत्येचा विचारही मनात आणू नका. असा
सल्लाही हजारे यांनी दिला. जनतेचे काम करताना आरोप होत असतात. मलाही यासाठी
तुरुंगात जावे लागले होते, असंही हजारे यांनी सांगितले.
मधल्या
काळात मी खूपच अस्वस्थ असल्याने भेटू शकले नसल्याचे देवरे यांना हजारे यांना
सांगितले. अण्णांना भेटून जाताना नवी ऊर्जा मिळते. हजारे यांची भेट आणि सल्ला
मोलाचा असल्याचे सांगून त्यांनी मधल्या काळातील घडामोडी आणि आरोपासंबंधी हजारे
यांच्याशी चर्चाही केली. हा विषय लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील आहे. मी यात
बोलू शकत नाही, असं
म्हणून हजारे यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला. मात्र, जर तुम्ही निर्दोष असाल तर नक्कीच चौकशीत ते सिद्ध होईल धीर धरा,
असा सल्लाही हजारे यांनी दिला.
0 टिप्पण्या